जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ येथे डेंग्यूचे संशयित १६ रुग्ण आढळले आहे. यातील १२ रुग्णांचे रक्त पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच शहरात डायरियाच्या रुग्ण संख्येतसुध्दा मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
पालिकेच्या दवाखान्यात २० रुग्णांवर डायरीयाचे उपचार सुरू आहे.बदलेले वातावरण, सारखा पडत असलेला पाऊस यामुळे रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरात डेग्यू संशयित १६ रुग्ण मिळाले आहे. या १६ रुग्णांपैकी १२ रुग्णांचे रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुढच्या आठवड्यात रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. राहिलेल्या ४ रुग्णांचे रक्त नमुनेसुध्दा तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.या रुग्णांवर शहरातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. हे रुग्ण डेग्यू संशयित म्हटले जात आहे. याची नोंद पालिकेच्या दवाखान्यात करण्यात आली आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने आल्यावर त्यांच्यावर अजून योग्य पध्दतीने उपचार होतील.
डायरियाचे रुग्ण वाढले
पावसाळ्याचे दिवस असल्याने गढूळ पाणी, दूषित पाणी तसेच बाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे यामुळे डायरीयाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भुसावळ शहरातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये मोठ्या प्रमाणावर रूग्णांवर उपचार केले जात आहे.संपूर्ण शहरात ५० पेक्षा जास्त डायरीयाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहे. यात पालिकेच्या दवाखान्यात २० रुग्णांवर उपचार केले जात आहे, असे पालिकेच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले