मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला, घराकडे परतत असताना काळाचा घाला, जीवलग मित्र ठार

जळगाव : दोन जीवलग मित्रांवर शुक्रवारी काळाने घाला घातला. नूतन मराठा महाविद्यालयातील मित्राची भेट घेऊन दोघांनी मेहरूण तलाव येथे इतर मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर घराकडे सुसाट परतत असताना अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन्‌ दुचाकी दुभाजकावर आदळून दोघे रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला फेकले जावून चारचाकीच्या खाली आले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसर्‍याची खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. ही ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजता गुजराल पेट्रोलपंपाजवळील उड्डाण पुलावर घडली. मयूर विठ्ठल लंके-साळुंखे (वय 19, रा. पथराड, ता. धरणगाव) व दीपक समाधान पाटील (वय 21, रा. बोरखेडा, ता. धरणगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

मयूर आणि दीपक हे जीवलग मित्र होते. नूतन मराठा महाविद्यालयातील मित्राला भेटण्यासाठी शुक्रवारी सकाळी दोघेही गावावरून दुचाकीने (एमएच-19-सीपी-0019) जळगावात आले होते. मित्राची भेट घेतल्यानंतर दोघांनी रामेश्र्वर कॉलनीमध्ये अल्पोपहार केला. नंतर मेहरूण तलाव येथे दुसर्‍या मित्राच्या वाढदिवसाला दोघांनी हजेरी लावली. वाढदिवस साजरा करून दोघे दुपारी 1 वाजता घराकडे दुचाकीवरून सुसाट निघाले. मयूर हा दुचाकी चालवत होता. गुजराल पेट्रोलपंपाजवळील उड्डाण पुलावर अचानक मयूर याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन्‌ सुसाट दुचाकी दुभाजकावर धडकली.

रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला फेकले गेले
दुचाकी ही दुभाजकावर आदळताच मयूर आणि दीपक हे रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला फेकले गेले. त्याच क्षणी खोटे नगरकडून शिवकॉलनीकडे एमएच-19-सीव्ही-0012 क्रमांकाची कार जात होती. या कारच्या खाली दोघे आले आणि त्यांना कारने दहा ते पंधरा फुटांपर्यंत फरफटत नेले. मात्र, या अपघातात मयूर याचा जागीच मृत्यू झाला, तर दीपक हा गंभीर जखमी झाला. शिवाय कार आणि दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. एवढेच नव्हे दुचाकीचा वेग एवढा प्रचंड होता की या रस्त्यावरील दुभाजकावर लावलेले प्लॅस्टिकचे कठडे तुटून दूरपर्यंत फेकले गेले.

वाहनातून हलविले रूग्णालयात
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. नागरिकांनी रुग्णवाहिका बोलवून दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती मयूर याला मृत घोषित केले. परंतु दीपक याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

दीपकचाही मृत्यू
डोक्यासह छाती व हातापायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे खासगी रूग्णालयात दीपक हा मृत्यूशी झुंझ देत होता. पण, अर्धा ते एक तासानंतर त्याचाही मृत्यू झाला. यावेळी कुटुंंबियांचा प्रचंड आक्रोश सुरू होता. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी कुटुंंबियांसह नातेवाईक व ग्रामस्थांची प्रचंड गर्दी झाली होती.
माणुसकीचे दर्शन
ही घटना घडताच मोठा आवाज झाला. काय झाले म्हणून पाहण्यासाठी अनेक जण जागीच थांबले. अपघाताची भीषणता लक्षात येताच अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. काही वेळातच या ठिकाणी जिल्हापेठचे पोलीस दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत तेथील नागरिकांनी मदत कार्य सुरू करून माणुसकीचे दर्शन घडवले.