Chalisgaon Assembly Constituency, भिकन वाणी : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ ‘सर्वसाधारण’ झाल्यानंतर निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला प्रथमच दुसऱ्यांदा निवडून आल्याची संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राजीव देशमुख यांची सन २००९ ची निवडणूक सोडली तर भाजपचाच उमेदवार गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विजयी झाला. १९९० पासून या मतदारसंघामध्ये भाजपचाच उमेदवार विजयी होत आहे.
मतदारसंघ राखीव असताना माजी वनमंत्री स्व. डी.डी. चव्हाण यांनी १७ वर्षे व माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे ह्यांनी १५ वर्षे तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.
गेल्या पाच वर्षांपूर्वी मंगेश चव्हाण व उन्मेष पाटील हे जीवलग मित्र, शत्रू कधी बनले हे भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या लक्षात आले नाही. गेल्या १० वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उन्मेष पाटील यांची प्रचाराची सूत्रे राजीव देशमुख यांना पराजित करण्यासाठी मंगेश चव्हाण यांच्याकडे होती आणि गेल्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे मंगेश चव्हाण यांचा पराभव करण्यासाठी भाजपचे उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख यांना मदत केली असल्याचा आरोप चव्हाण यांनी भाजपच्या वरिष्ठाकडे पुराव्यानिशी केला होता, तरीसुद्धा भाजपने उच्चशिक्षित तरुण, तडफदार आमदार उन्मेष पाटील यांची पाच वर्षाची कारकीर्द बघता, त्यांना पक्षाने सन २०१९ मध्ये खासदार पदाची संधी दिली आणि संसदेमध्ये त्यांनी त्याचा ठसा उमटवला. भारतात ‘टॉप टेन खासदार म्हणून नावलौकिक मिळविला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांनी विद्यमान खासदार पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली तर मी मंत्रिपदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतो, अशी धमकी वजा इशारा दिल्याचे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर पत्रकारांना सांगितले होते. त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रामध्ये पाटील यांना सोडून सर्वच विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली.
नंतर पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ‘उबाठा’ पक्षामध्ये प्रवेश केला आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे मित्र पारोळ्याचे करण पवार यांना उमेदवारी मिळवून दिली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांना चाळीसगाव विधानसभेमध्ये फक्त १६ हजाराचे मताधिक्य मिळाले होते.
गेल्या १५ वर्षांपासून चाळीसगाव विधानसभेची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे असलेली जागा मिळवली. मात्र यावेळी राज्यामध्ये पर्यायाने चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात ‘न भूतो न भविष्यतों’ अशी लक्ष्मीची उधळण झाली.
एकूण ५० ते ६० खोके रिते केले गेले असल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे, गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्याचे दर जसे भरमसाठ वाढतात तसे घोडेबाजाराचा रेटदेखील वाढलेले दिसले. त्याचप्रमाणे लाडकी बहीण व त्यामुळे महिलांचे वाढलेले मतदान, चाळीसगाव शहरात काही भागांमध्ये झालेली रस्त्याची कामे, ग्रामीण भागांमध्ये आमदार निधीतून प्रत्येक गावामध्ये झालेली विकास कामे हेसुद्धा मंगेश चव्हाण यांना जास्त मताधिक्य मिळविण्यामागचे कारण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शहरात व ग्रामीण भागात मतदानाचा कल लक्षात घेता तसेच कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलेली प्रचाराची सूत्रे. त्यामुळे त्यांच्यात
निर्माण झालेला विश्वास म्हणून चव्हाण यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्याचा परिणाम मतमोजणीच्या २४ तास अगोदर उमेदवार मंगेश चव्हाण यांचे विजयी फलक शहरातील सर्व भागात लावून ‘बॅनरने वेढलेले चाळीसगाव’ असे चित्र निर्माण केले गेले.
उबाठाचे उमेदवार उन्मेष पाटील यांना उशिरा जाहीर झालेली उमेदवारी, त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यास झालेला विलंब, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी नाकारलेली पक्षाची उमेदवारी, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, तरी देशमुख यांच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीचा फायदा, व त्यांच्या कार्यकर्त्यांचा ‘उबाठा’चे पाटील यांना पाहिजे तसा मिळाला नाही.
अल्पसंख्याक समाजामध्ये वाणी, चौधरी, मुस्लिम, शिंपी, ब्राम्हण, न्हावी कुमावत, बंजारा आदी तसेच अनुसूचित समाजाची मते मिळविण्यामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कमी पडले, या समाजांची ७० टक्के मते महायुतीच्या उमेदवाराला मिळाली असल्याचे विजयी उमेदवाराचे मताधिक्य लक्षात घेता, यासंदर्भात शंका घेण्याचे कारण नाही. कारण महायुती सरकारने निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी अल्पसंख्याक समाजाबद्दल काढलेली महामंडळे याचाही फायदा चव्हाण यांना झाला.
लेखाजोखा मांडण्यात कार्यकर्ते यशस्वी
निवडणुकीत उमेदवारांनी एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप, एकमेकांविरुद्ध काढलेली प्रचारपत्रके, उन्मेष पाटील यांनी तालुक्यासाठी १० वर्षात काय काम केले, याचा लेखाजोगा असणारी निनावी काढलेली पत्रके मतदारांपर्यंत, शहरातील व्यापारी वर्गापर्यंत पोहचविण्यास भाजपचे कार्यकर्ते यशस्वी झाले. चव्हाण यांनी पाच वर्षात काय काम केले याचा लेखाजोगा ‘मंगेश पर्व’ पुस्तकाद्वारे व ‘मंगेश वार्ता’ या पेपरसारख्या पत्रकाद्वारे मतदारांपर्यंत पोहचविण्यात चव्हाण हे यशस्वी झाले आणि त्याचा फायदा त्यांना झाला.
मतदारांचा विश्वास सार्थ ठरवावा
आमदार चव्हाण यांनी सर्व मतभेद विसरून तालुक्याची उर्वरित कामे पूर्ण करून, तालुक्याचा विकास पुन्हा करण्याचे, तालुका सुजलाम सुफलाम होण्यासाठी प्रयत्न करण्याचे ध्येय ठेवावे आणि मतदारांचा विश्वास सार्थ करून दाखविण्याची संधी दुस-यांदा मिळाली आहे. तो विश्वास आता सार्थ करून दाखविण्याची वेळ आली आहे.