Chalisgaon bag theft : दोन तासांत बॅगेसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चाळीसगाव : येथील बस स्थानकातून शनिवारी एकाची ३ लाख ५० हजार रुपये किमतीची बॅग गहाळ झाली होती. चाळीसगाव शहर पोलीस व पोलीस पाटील यांच्या मदतीने बॅग चोरट्यास दोन तासात अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , चाळीसगाव तालुक्यातील प्रदीप नारायण भोसले हे शनिवार, २९ रोजी चाळीसगाव बस स्थानकवर आले होते. यावेळी त्यांची बॅग अज्ञात चोरट्याने पळवली. त्यांच्या बॅगेत सहा हजार दोनशे रुपये रोख, एक मोबाईल, सोन्याचे मंगळसुत्र असा अंदाजे तीन लाख ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज होता. आपली बॅग चोरट्याने पळवल्याची बाब लक्षात येताच प्रदीप भोसले यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पंकज पाटील, अजय पाटील, निलेश पाटील, अमोल भोसले, नंदकिशोर महाजन, विनोद खैरनार, मोहन सुर्यवशी, विजय महाजन यांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोकॉ ईश्वर पाटील, पोकॉ गौरव पाटील यांनी दिलेल्या तांत्रिक माहितीच्या मदतीने बॅगेतील मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले. यात बॅगेचे लोकेशन चाळीसगाव तालुक्यातील शिरगाव येथे दाखविले. त्यानंतर पोलीस पाटील शिरसगाव संदीप निकम व गणेश चव्हाण यांच्या मदतीने ही बँग पोलिसांनी हस्तगत करत दोन तासांतच पोलिसांनी या चोरीचा छडा लावला.