---Advertisement---
चाळीसगाव शहरात रस्त्यावर मध्यभागी दुचाकी उभी करणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केल्याचा राग येऊन दुचाकी चालकाने चाळीसगाव शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना चाळीसगाव शहरात घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी राहुल जाधव हे बुधवारी (२७ ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करीत होते. तेव्हा त्यांना रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी लावलेली दिसून आली. त्यांनी दुचाकीचालकाचा शोध घेतला, पण तो कुठेही दिसून न आल्याने त्यांनी दुचाकी चालकावर ऑनलाईन ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
काही वेळाने त्या ठिकाणी दुचाकीस्वार आला व माझ्या दुचाकीवर दंडात्मक कारवाई का केली म्हणून हुज्जत घालण्यास सुरुवात केली व पोलीस कर्मचारी राहुल जाधव यांना अरेरावी करून शिवीगाळ केली. त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यामुळे नागरिकांनी दुचाकीस्वारास चोप दिला.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीचालक संजय पवार (रा. चौधरी वाडा, चाळीसगाव) याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहेत.