जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात खळबळ उडवून देणाऱ्या खंडणी प्रकरणात पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी त्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली तर एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. या बदलीमुळे शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
चाळीसगाव शहरातील एका कॉम्प्युटर व्यावसायिकाकडून एक लाख वीस हजार रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून पोलीस कर्मचारी अजय पाटील यांच्याविरुद्ध सोमवारी 19 मे रोजी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी, स्थानिक भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
तडकाफडकी कारवाई
आमदार चव्हाण यांच्या मागणीची आणि प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ निर्णय घेतला. त्यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची चाळीसगाव पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात बदलीचे आदेश दिले. तर पोलीस कर्मचारी अजय पाटील याला निलंबित करण्यात आले आहे. या तातडीच्या बदलीमुळे आणि निलंबित केल्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
खाकीवर पुन्हा डागाळली
पोलीस दलाच्या प्रतिमा या प्रकरणामुळे पुन्हा एकदा डागाळली आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच खंडणी उकळल्याचा आरोप असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास कसा आणि कोणत्या दिशेने होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.