Champa Shashthi 2024 : डिसेंबरचा महिना सुरु झाला असून यात मार्गशीर्ष महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. या काळात खंडोबाची नवरात्री आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते. हा महिना धार्मिकदृष्ट्या अधिक पवित्र मानला जातो.
२ डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु झाला असून मार्तंडभैरव षडरात्रोत्सवचाही प्रारंभही झाला आहे. या दिवशी देव-दिवाळी देखील साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात. चंपाषष्ठी किंवा स्कंद षष्ठी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथी साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने जनतेला संकटातून मुक्त केले होते. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो.
चंपाषष्ठी शुभ मुहूर्त
षष्ठी तिथी प्रारंभ – ६ डिसेंबर २०२४, दुपारी १२ वाजून ५ मिनिटे
षष्ठी तिथी समाप्ती – ७ डिसेंबर २०२४ सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी
चंपाषष्ठी पूजा विधी
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्ठी तिथीपर्यंत हा उत्सव सुरु असतो.
या सहा दिवसात मार्तंडदेवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात.
तसेच विधीवत खंडोबाची पूजा करुन आरती म्हटली जाते.
चंपाषष्ठीच्या दिवशी अनेक धान्यांचे पीठ (ठोंबारा)गव्हाचा रोडगा आणि वांग्याचे भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. तसेच दिवे ओवाळणीची देखील पद्धत आहे
तळी का उचलतात
चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबाती कुळाचा कुळाचार असतो, त्यामुळे घरोघरी तळी उचलतात. ताम्हणामध्ये भंडारा पसरून त्यावर ५ विड्याची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे व मधोमध भंडारा खोबरे वाटी ठेवावी. ५ मुले किंवा पुरुषांना बोलावून घट उचलावा व ३ वेळा येळकोट येळकोट म्हणून तळी उचलावी. त्यानंतर तळी भंडारा करावा व दिवटी बुधले प्रज्वलित करावे.
चंपाषष्ठीचे महत्व
या दिवशी मार्तंड भगवान आणि सूर्याची विशेष पूजा केली जाते. सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो. यावेळी शिवाचेही ध्यान केले जाते आणि शिवलिंगाची पूजा केली जाते, ज्यामध्ये दूध आणि गंगाजल अर्पण केले जाते. देवाला चंपा फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. या दिवशी जमिनीवर झोपण्याचेही महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा आणि व्रत पापांचा नाश करते, समस्या दूर करते आणि जीवनात सुख-शांती आणते. चंपाषष्ठीची संबंधित विविध मतप्रवाह प्रचलित आहेत.