Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी १५ सदस्यीय भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी आज (१८ जानेवारी) मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा कर्णधार असेल, शुभमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले आहे. त्याच वेळी, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला नाही, अर्शदीप सिंगचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय, यशस्वी जयस्वालला प्रथमच एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाकडे, तीन सलामीवीर, २ विकेटकीपर, ४ अष्टपैलू, १ विशेषज्ञ फिरकी गोलंदाज आणि ३ वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली आहे.
करुण नायरला संघात स्थान नाही
दरम्यान, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या करुण नायरबद्दल चर्चा झाली आहे, परंतु सध्या त्याच्यासाठी संघात स्थान नाही. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी ‘हायब्रिड मॉडेल’ अंतर्गत पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना १९ फेब्रुवारी रोजी यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीमध्ये खेळला जाईल. तर भारतीय संघ २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर.