राज्यात हळूहळू थंडीचा जोर वाढत असून, दिवसाच्या तापमानातही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर थंडी कमी झाली होती, मात्र आता हवामान विभागाने थंडीसह पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या राज्यावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राजस्थानसह त्याच्या लगतच्या भागात हे वारे सक्रिय असून पश्चिम मध्य अरबी समुद्रावरून पुढे सरकत आहेत. यामुळे राज्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रामुख्याने पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांसह ४०-४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या नैऋत्येकडील मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान राहणार असून हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान २ ते ३ अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे, तर विदर्भात किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये धुक्याची चादर पसरलेली असून आजही विरळ धुके पडण्याचा अंदाज आहे. सध्या राज्यात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याने थेट सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत आहे. त्यामुळे मुंबई, उपनगर आणि कोकणामध्ये तापमान तुलनेने उष्ण जाणवत आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.