Chandrahar Patil On Shivraj Rakshe : अहिल्यानगर येथे झालेली 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादात सापडली आहे. महाराष्ट्र केसरी 2025 या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील अंतिम सामना अहिल्यानगरमध्ये पार पडला. अंतिम लढतीमध्ये महेंद्र गायकवाडने मैदान सोडल्याने पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले आहे.
महेंद्र गायकवाड याने सामना संपायला अवघे काही सेकंद बाकी असताना पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मैदान सोडलं. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आलं. तसेच शिवराज राक्षे यानेही उपांत्य फेरीत पंचांने दिलेल्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. शिवराजने पंचाची कॉल धरली आणि लाथही मारली. दोघांनी पंचांच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेतली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेकडून महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोघांचं 3 वर्षांसाठी निलंबन केलं आहे.
यात शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेल्या कुस्तीचा निकाल सदोष असल्याचा आरोप शिवराज राक्षे यांचे प्रशिक्षक आणि भावाने केला आहे. एवढेच नाही तर शिवराज राक्षेचा पराभव आंतरराष्ट्रीय संस्थांनी जर मान्य केला तर एक कोटीचे बक्षीस देईल, असं शिवराजचे प्रशिक्षक रणधीर पोंगल यांनी जाहीर केल आहे. या सर्व प्रकरणावरुन डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटील यांनी शिवराजच्या भूमिकेचं स्वागत केलंय.
चंद्रहार पाटील काय म्हणाले?
पृथ्वीराज मोहोळ याचे मी अभिनंदन करतो, त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे. शिवराज राक्षेने खरं तर पंचाना गोळ्या घालायला पाहिजेत. मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलोय.त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो”, असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं.