चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विदर्भातून पहिला उमेदवारी अर्ज सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गांधी चौकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांच्यासाठी महायुतीची छोटेखानी विजय संकल्प सभा पार पडली. त्यानंतर रॅलीच्या स्वरूपात सुधीर मुनगंटीवारांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिका कार्यालयावर अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले.
सुधीर मुनगंटीवार सभेत बोलताना म्हणाले की, “घाई घाईमध्ये मी मंचावर आलोय, जर कोणाचं नाव घ्यायला विसरलो असेल, तर पाय आपटू नका. कारण तुम्ही पाय आपटले, तर निवडणुकीत आपटायची वेळ येईल. मी देवाचा आशीर्वाद घेऊन आलो. मात्र, ज्यांच्या नावांमध्येच देव आहे, ते देवेंद्र फडणवीस आशीर्वाद द्यायला आले असतील, तर जगात कोणीही पराभूत करू शकत नाही. महायुतीचे सर्व घटक आणि कार्यकर्ते कृत्रिमपणे नाही, तर मनापासून कामाला लागले आहेत. म्हणून वाटतं निवडणूक माझी नाही. तर ही बंधूंनो तुमची आहे. म्हणूनच ठरवलं आहे, जिंकलो तर माजायचं नाही, हरलो तर खचायचं नाही.”