आ.चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ आज संपणार

तरुण भारत लाईव्ह न्यूज  : जिल्ह्यासह राज्यात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोना संसर्ग प्रादूर्भाव प्रतिबंधांमुळे तसेच अन्य कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संंस्थांच्या निवडणुका वेळोवेळी लांबणीवर पडल्या आहेत. याचा फटका विधान परिषद निवडणुकीला बसला आहे. विधान परिषद सदस्य चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ सोमवार, 5 डिसेंंबर रोजी संपुष्टात येत आहे. परंतु जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेकविध कारणांमुळे लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था गटाव्दारे होणारी विधान परिषद सदस्य निवड किमान सहा महिनेतरी लांबणीवर पडणार असल्याचे संकेत आहेत.

जिल्ह्यात 2016 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था गटातून गिरीश महाजन गटाच्या चंदूभाई पटेल यांना संधी मिळाली. चंदूभाई पटेल यांची बिनविरोध निवड जवळजवळ निश्चित होती. परंतु निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या वेळेपूर्वीच विजय भास्कर पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक झाली. या निवडणुकीच्या 22 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या मतमोजणीव्दारे चंदूभाई पटेल यांनी 421 मिळून विजयी झाले तर प्रतिस्पधी उमेदवार विजय भास्कर पाटील यांना 90 मते मिळाली. आ. चंदूभाई पटेल यांचा विधान परिषद सदस्य पदाचा पंचवार्षिक कालावधी 5 डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे.

त्यापूर्वी ऑक्टोबरअखेर विधान परिषद निवडणूक होणे अपेक्षित होते. जिल्ह्यातील बहुतांश नगरपरिषदांचा कार्यकाल 2020-21 दरम्यान संपला आहे. पंचायत समित्यांचा मार्च तर जिल्हा परिषदेचा कालावधी एप्रिल 2022 मध्ये संपुष्टात आला आहे. दरम्यान, परंतु गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोरोना संसर्ग प्रतिबंधामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या-ना त्या कारणाने लांबणीवर पडत आहेत.

एकूणच जिल्हा परिषद व नगरपालिकांवर प्रशासक असून विधान परिषदेसाठी मतदान करणारे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपरिषदांच्या प्रतिनिधींची निवड झालेली नाही. जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुुकीनंतरच विधान परिषद सदस्यांची निवडणूक होऊ शकते. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक किमान सहा महिने तरी होणे दृष्टीपथात नाही.