---Advertisement---
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी सर्व समावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती तर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा १५ फेब्रुवारी रोजी महिला स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ वाजता ही रॅली छत्रपती शिवाजी चौक येथून सुरू होणार आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून सुरू होऊन शहरातील विविध मार्गाने फिरणार आहे. शोभायात्रेमध्ये ढोल-ताशा पथक, पारंपरिक वेशभूषा तसेच सांस्कृतिक सादरीकरणांचा समावेश असणार आहे.
१६ फेब्रुवारी रोजी सकाळी रंगभरण आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा पांडुरंग उद्यान येथे होणार असून किल्ले बनवा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरात आयोजित करण्यात आली आहे.
१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. असे महोत्सव समितीचे अध्यक्ष मंत्री संजयजी सावकारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
या शिवजयंती महोत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर करण्याचा उद्देश आहे.कार्यक्रमाला गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, रक्षा खडसे, अशोक भाऊ जैन, एकनाथ खडसे तसेच राजू मामा भोळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनात दीपमाला काळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला राधेश्याम चौधरी, राम पवार, कल्पिता पाटील, विनोद देशमुख, शंभू पाटील आदींसह सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे कार्यकारीनिचे पदाधिकारी सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते .









