जळगाव : कीटकनाशक औषधाची एक्सपायरी झाली असताना हे कीटकनाशक कृषी केंद्रचालकाने शेतकऱ्याला विक्री केले. या औषधाच्या फवारनीत कापसाचे नुकसान झाले. फसवणूक केल्याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अॅग्रो एजन्सी चालकाविरोधात मंगळवार, २३ रोजी गुन्हा दाखल झाला.
गणेश श्रीधर बडगुजर (वय ४६, रा. पिंपळगाव हरे.) हे शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी ९ ऑगस्ट २०२३ रोजी गावातील शुभम अॅग्रो एजन्सी येथुन सि झेंटा – पोला ९८५ हे एक किलोग्रॅम वजनाचे सुमारे २६५० रुपये किमतीचे औषध घेतले. त्यानंतर या किटकनाशकाची त्यांनी शेतातील कापसावर फवारणी केली असता कापूस पिकाचे नुकसान झाले. हा प्रकार शेतकऱ्याने अॅग्रो कृषी केंद्र चालकाच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर शेतकऱ्यासोबत दोघांनी कापसाची शेतात पाहणी केली. मात्र या नुकसानीला मी जबाबदार नाही, असे कृषी संचालकाने सांगितले.
शेतकऱ्याने सि झेंटा- पोला ९८५ चा बॉक्स पाहिला असता त्याच्यावरील एक्सपायरी २६ मे २०२५ अशी होती. तर बॉक्समधील रॅपर चेक केले असता त्यावर एक्सपायरी दिनांक २६ जून २०२३ आढळून आली. शेतकऱ्याला ९ ऑगस्ट रोजी हे औषध देताना ते एक्सपायरी असतानाही त्याची विक्री करुन फसवणूक केली. या प्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार अॅग्रो एजन्सीचे जर्नादन देव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस नाईक पांडुरंग गोरबंजारा हे करीत आहेत.