Chhagan Bhujbal : राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर छगन भुजबळ आता येवला मतदारसंघात सक्रिय झाले असून, अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात झालेल्या शेतकरी संकटावर तातडीने लक्ष केंद्रित केले आहे.
पावसामुळे येवला आणि नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र दिले आहे.
छगन भुजबळ यांच्या पत्रात म्हटले आहे की, येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात निफाड, सिन्नर, देवळा, नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. गहू, कांदा, द्राक्षे, तूर, मका, कपाशी, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचा समोर एक मोठे संकट उभे आहे.
अवकाळी पावसामुळे शेतातील गहू आणि कांदा ओला होऊन पिकांची गुणवत्ता प्रभावित झाली आहे. तसेच, कांद्याची काढणी होत असताना जमिनीतच सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गव्हाचे पिक आडवे पडल्यामुळे शेतकऱ्यांना गहू हाताशी येणार नाही. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी खूप त्रस्त झाले आहेत.
तुम्ही अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान तातडीने पंचनामे करून, शासनाकडून जास्तीत जास्त मदतीची मागणी करावी, अशी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना सूचना दिली आहे.