मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींत वाढ होणार असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील 3 आरोपींनी केलेल्या माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अर्जावर सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आलं आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं खटल्यातील आरोपींची विनंती मान्य केली आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यात सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज हे तीन आरोपी अटकेत आहेत. या तिनही आरोपींनी माफिचा साक्षीदार होण्याकरता अर्ज दाखल केला आहे. मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी याप्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, ही सुनावणी थांबवून आधी आमच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जावर निर्णय घ्यावा, ही या तिघांची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज सादर केला होता. सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या आरोपींनी माफीच्या साक्षीदारासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावर 20 डिसेंबरच्या सुनावणीत उत्तर सादर करण्याचे ईडीला निर्देश देण्यात आले होते. विद्यमान मंत्री छगन भुजबळ या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.