---Advertisement---
Chhatrapati Sambhajinagar News : भारतीय शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून तसेच पशुपालनासह मिश्र शेतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि आव्हानांचा विचार करता कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्य मंदिरात दि. २३ रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. भागवत पुढे म्हणाले, ज्याला बोलता येत नाही, उपचार करताना जो विरोध करतो, त्याचेही दुःख समजून त्याला बरे करण्याची कला आपल्याकडे आहे. शालिहोत्र या प्राचीन पशुवैद्याने घोड्याचे वय व गुणवत्तेचे शास्त्र सांगितले होते. आपली ही परंपरा अभिमानास्पद आहे. शेतीत पाश्चात्त्य तंत्रज्ञान व आधुनिकता आवश्यक तिथे स्वीकारून, भारतीय पद्धतीनुसार शेती व पशुपालनाचा समन्वय साधला तर शेतकऱ्याला लाभ होईल. देशी गोवंश व पारंपरिक शेती पद्धतीबाबत लोकांचा विश्वास वाढत आहे. भारतीय शेतीची आधुनिक रूपे विकसित करूनच आपण कृषी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू शकतो.
तर संस्थेची सुरुवात प्रतिकूल परिस्थितीत झाली. अनेक सहकाऱ्यांच्या योगदानामुळे आज संस्थेची क्षमता वाढली असून विविध पुरस्कार प्रदान करण्याइतपत कामकाज विस्तारले आहे, असे अध्यक्षांनी सांगितले.
गुणवंताचा गुणगौरव
पशुवैद्यक शास्त्रात सर्वोच्च गुण प्राप्त करणारे विद्यार्थी व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही गौरविण्यात आले. तसेच प्रतिष्ठानची स्मरणिका प्रकाशनही यावेळी झाले. या प्रसंगी डॉ. अशोक दिवाण (अध्यक्ष, ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान) व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पशुपालक व पशुवैद्यकीय पदवीधरांना आदर्श पशुपालक, आदर्श गोपालक, उत्कृष्ट पशुवैद्य, आदर्श प्राध्यापक अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आदर्श पशुपालक पुरस्कार – सौ. वैशाली भाऊसाहेब चव्हाण, देवणी गोवंश आदर्श गोपालक – रामकृष्ण नामदेव दरगुडे, कै. खंडेराव जाधव आदर्श शेळीपालक पुरस्कार – राहुल लक्ष्मण पुऱ्हे, गुणवंत विद्यार्थी – डॉ. कु. ईश्वरी जोशी (तीन पुरस्कार), यशवंत विद्यार्थी सुवर्ण पदक पुरस्कार – डॉ. वैभव विष्णुदास हरडे, गुणवंत विद्यार्थिनी – डॉ. कु. शारदा ढाकरके, आदर्श पशुवैद्य डॉ. अनिल कौसडीकर, पशुवैद्य भूषण डॉ. नरेश गीते, जीवनगौरव पुरस्कार – डॉ अरविंद मुळे, आदर्श प्राध्यापक डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, उत्कृष्ट पशुवैद्य सहदेव पुरस्कार – डॉ. आनंद राजशेखर दडके, उत्कृष्ट पशुवैद्य नकुल पुरस्कार – डॉ. विजय ढोके, उत्कृष्ट पशुवैद्य पुरस्कार– डॉ.प्रमोद रतनलाल दोशी, आदर्श प्राध्यापक डॉ. विश्वंभर पाटोदकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.