मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उद्या, 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील बँका आणि शासकीय कार्यालये या दिवशी बंद राहतील. मात्र, इंटरनेट बँकिंग, UPI आणि इतर डिजिटल व्यवहार सुरू राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हा महाराष्ट्रात अत्यंत आदराने साजरा केला जाणारा दिवस आहे. महाराष्ट्र शासनाने या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित केली असून, राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. मात्र, अनेक शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विशेष कार्यक्रम, नाट्य सादरीकरणे, भाषण स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
हेही वाचा : हृदयद्रावक! एकीकडे बारावीचे पेपर अन् इकडे वडिलांचं निधन, चेतनवर कोसळला दुःखाचा डोंगर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या 2025 च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, ही सुट्टी केवळ महाराष्ट्रातच लागू असेल. त्यामुळे इतर राज्यांतील बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील.
महाराष्ट्रानंतर 20 फेब्रुवारी रोजी मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये राज्याच्या स्थापना दिनानिमित्त बँका आणि शासकीय कार्यालये बंद राहतील. अरुणाचल प्रदेशला 20 फेब्रुवारी 1978 रोजी, तर मिझोरमला 20 फेब्रुवारी 1987 रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला होता. तसेच, 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त विविध राज्यांमध्ये बँकांना आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी राहील. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू-कश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा समावेश आहे. मात्र, त्रिपुरा, तामिळनाडू, सिक्कीम, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि पश्चिम बंगाल येथे महाशिवरात्रीच्या दिवशी बँका सुरु राहतील.
फेब्रुवारी 2025 मधील महत्त्वाच्या बँक सुट्ट्यांची यादी
- 19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (महाराष्ट्र)
- 20 फेब्रुवारी: मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस
- 26 फेब्रुवारी: महाशिवरात्री (काही राज्यांमध्ये बँका बंद)
- 28 फेब्रुवारी: लोसार (सिक्कीम)
या सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी बँकांच्या शाखा बंद राहतील, मात्र इंटरनेट बँकिंग, UPI, एटीएम आणि इतर डिजिटल सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्राहक त्यांच्या बँकिंग व्यवहारांसाठी डिजिटल सुविधांचा लाभ घेऊ शकतात.