जिंदाल कंपनीत स्फोट, दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत आज सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. कंपनीला मोठी आग लागली आहे. या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झालेले आहेत. या घटनेमध्ये आतापर्यंत १९ स्फोट झालेले आहेत. त्यामुळे मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानांचे मार्ग बदलण्यात आलेत.

या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इगतपुरी येथे जात घटनेची माहिती घेतली आणि जखमींची रुग्णालयात जावून चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर केली आहे.

शिंदेंनी ट्विट करुन सांगितलं की, कंपनीत बॉयलर फुटून झालेल्या या दुर्घटनेत १७ जण जखमी झाले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये तर जखमींवर शासकीय खर्चात सर्व उपचार करण्यात येतील. तसेच या घटनेमागील कारणे जाणून घेण्यासाठी या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आग विझवण्यासाठी इगतपुरीसह निफाड, पिंपळगाव बसवंत आणि नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांतून अग्निशमन पथकाच्या २० हून अधिक गाड्या पाचारण करण्यात आल्या होत्या. ही आग कंपनीतील बॉयलरमुळे लागल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळला असून बॉयलरमुळे आग लागण्याची शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

राज्याचे बाष्पके संचालक धवल प्रकाश अंतापूरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. जिंदाल पॉलीफिल्म लि. इगतपुरी या कंपनीत एकूण ५ बॉयलर्स आहेत त्यापैकी ३ हे वेस्ट हीट रिकव्हरी वा थेरमिक फ्लुइडने चालणारे आहेत. म्हणजेच या बॉयलर्समध्ये वाफ तयार करण्यासाठी ज्वलनशील इंधन लागत नाही. र्वरित २ बॉयलर्स हे स्मॉल इंडस्ट्रियल बॉयलर्स प्रकारातील आहेत म्हणजेच छोटे बॉयलर्स आहेत. त्यामुळे बॉयलर मुळे आग लागण्याची शक्यता कमी आहे.

जखमी
राकेश सिंग
गणेश यादव ४०
हिरामण यादव ४९
पवित्रा मोहिती २२
कुमार सजीव २८
कैलास कुमार सिंग ४०
ज्ञानेश्वर यादव ३५
श्रध्दा गोस्वामी २६
याचिका कटियार ३०
पूजा सिंग २५
अभू तालीम २९
मनोज पाठक ३३
लखनसिंग ४९
सूर्यकुमार राऊत ४१
गजेंद्रसिंग पाल