---Advertisement---
मुंबई / जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखत सर्व ४६ जागांवर विजय मिळवला आहे. आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लढतीत भाजपला एकही अडथळा आला नाही. या निकालानंतर आमदार भोळे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार करत जळगावच्या पुढील विकासाचा आराखडा मजबूत करण्याची ग्वाही दिली.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने प्रचाराची दिशा सुरुवातीपासूनच स्पष्ट ठेवली होती. शहराच्या मूलभूत प्रश्नांपासून ते दीर्घकालीन विकासापर्यंतचे मुद्दे मतदारांसमोर मांडण्यात आले. आमदार राजूमामा भोळे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवत पक्षाची रणनीती आखली. ‘विकास’ आणि ‘प्रामाणिक प्रशासन’ या मुद्यांवर भर दिल्याचा परिणाम थेट निकालात दिसून आला. सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी ठरले, तर विरोधी पक्षांना एकाही प्रभागात यश मिळाले नाही.
निवडणुकीनंतरचा आढावा घेण्यासाठी आणि आगामी कामकाजावर चर्चा करण्यासाठी आमदार भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करत निवडणुकीतील नियोजन आणि पक्षसंघटनाचे विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जळगावच्या मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाची दखल घेत राज्य सरकार शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे स्पष्ट केले. आमदार भोळे यांच्या नेतृत्वाखाली जळगावचा विकास अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भेटीनंतर बोलताना आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, हा विजय एखाद्या व्यक्तीचा नसून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा आणि जळगावकरांच्या विश्वासाचा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे अंमलात आणल्यामुळेच हे यश मिळाले असून, येत्या काळात जळगावच्या सर्वांगीण प्रगतीवरच लक्ष केंद्रीत राहील, असे त्यांनी नमूद केले.









