गडचिरोलीच्या विकासाचे नवे पर्व; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं नागरिकांना मोठं ‘गिफ्ट’

गडचिरोली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी  अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींना सुरुवात केली. जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली, ज्यामुळे जिल्ह्यात माओवाद विरोधी लढ्याला मोठे यश मिळाले.

77 वर्षांत प्रथमच अहेरी-गर्देवाडा बससेवा

देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत पहिल्यांदाच अहेरी ते गर्देवाडा बससेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगी त्यांनी स्वतः बसमधून प्रवास केला.

लॉईड्सच्या 6200 कोटींच्या गुंतवणुकीचा शुभारंभ

लॉईड्स कंपनीने विविध उपक्रम सुरू करत 6200 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. यामुळे 9000 हून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.

 या अंतर्गत : डीआयआय प्लांट (400 कोटी रुपये, 700 रोजगार)

पेलेट प्लांट आणि स्लरी पाईपलाईन (3000 कोटी रुपये, 1000 रोजगार)

आयर्न ओअर ग्राईडिंग प्लांट (2700 कोटी रुपये, 1500 रोजगार)
गारमेंट युनिट (20 कोटी रुपये, 600 रोजगार)
लॉईड्सने कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना 1000 कोटी रुपयांचे शेअर्स प्रदान करून त्यांना नवजीवन देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.

ग्रीन माईनिंग आणि शिक्षणाचा विकास

गडचिरोलीत ग्रीन माईनिंगच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि अपघातांचे प्रमाण घटेल. याशिवाय गोंडवाना विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियन विद्यापीठ यांच्यात करार होणार असून माइनिंगशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण : एक नवी दिशा

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात ताराक्कासह 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांना नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी 86 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

गडचिरोलीच्या विकासासाठी दृढ संकल्प

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीला “पोलाद सिटी” म्हणून विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच, माओवादविरोधी मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गडचिरोलीतील या दौऱ्याने जिल्ह्याला विकास, सुरक्षितता, आणि शांततेच्या दिशेने एक नवा आशावाद दिला आहे.