मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहण्याचे दिले आश्वासन

अमळनेर : पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१२५ वर्ष) आहे. या काळात त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्षा प्रा.डॉ. उज्ज्वला मेहंदळे व संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी ना.एकनाथ शिंदे यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेत कामाबद्दल समाधान व्यक्त केले. संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे सांगत संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासन देखील दिले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, साने गुरुजींच्या कर्मभूमीत मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही केवळ खान्देशसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. या संमेलनात घेण्यात येणाऱ्या विषयांवरील मंथनामुळे राज्याला दिशा देखील मिळेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. संपूर्ण खान्देशला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा राहिली आहे. यामुळे हे संमलन निश्चितपणे यशस्वी होईलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.