Eknath Shinde Resignation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार

#image_title

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. मात्र मुख्यमत्री कोणत्या पक्षाचा होणार याचा तिढा सुटलेला नाही. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटले असून अद्यापही महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट झालेला नाही.

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.  भाजपच्या जागा जास्त असल्याने मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी बिहार पॅटर्न राबवावा असे शिंदेसेनेच्या शिवसैनिकांची मागणी आहे.

दरम्यान, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र राज्यपालांकडे सोपवलं आहे.

मात्र, यावेळी महायुतीकडून अद्याप राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही. एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी ११.१५ च्या दरम्यान राजभवन गाठलं. यावेळी त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. शिंदे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते.