महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होईपर्यंत सुरुच राहणार कारवाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

जोपर्यंत महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होत नाही तोपर्यंत कारवाई सुरुच राहणार, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, यावर राज्य सरकारने कारवाई सुरु केली आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “ड्रग्जमुळे तरुण पीढी वाया जात आहे. पुण्यात जे काही घडलं तिथून सुरुवात झाली आहे. आता फक्त पुणे, ठाणे, नाशिक आणि मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यभरात जिथे जिथे ड्रग्जची विक्री होते तिथे कारवाई होणार आहे.”
 
 
 “ड्रग्जमुळे तरुणांचं आयुष्य बरबाद होतं आणि त्यांचा परिवार चिंतित होतो. ती मुलं आमच्या मुलांसारखीच आहे. त्यामुळे सरकारने ड्रग्ज विकणाऱ्यांवर आणि ते ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यांची पाळमुळं खोदून नष्ट करण्यात येणार आहे. शाळा, कॉलेजच्या आजूबाजूला असलेले पब, हॉटेल, टपऱ्या, दुकानं हे सगळं बुलडोजरने उखडून टाकण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. जोपर्यंत संपुर्ण महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरु राहिल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.