Devendra Fadnavis : शेंदुर्णीत मुख्यमंत्री फडणवीसांची तोफ, शेतकऱ्यांसाठी केल्या मोठ्या घोषणा

शेंदुर्णी (ता. जामनेर) : सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित गौरव ग्रंथ प्रकाशन व भव्य शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत जोरदार फटकेबाजी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा करताना, पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्याचा पुनरुच्चार केला. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांचीही उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज एका ऐतिहासिक संस्थेत येण्याची संधी मिळाली, याबद्दल मी संजय भाऊ तुमचे आभार मानतो. ही संस्था स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर स्थापन झाली. त्या काळात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यामुळे गावाला दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने तो दंड माफ केला आणि त्या पैशातून गरुड साहेबांनी मुलांना शिक्षण मिळावे म्हणून या संस्थेची स्थापना केली. हा त्याग आणि दृष्टीकोन खरंच प्रेरणादायी आहे.”

हेही वाचा : दोन बायका अन् फजित ऐका, असा ठरला तिघांचा फॉर्म्युला!

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने मोठ्या घोषणा केल्या. ते म्हणाले, “शेतकऱ्यांना पाणी, वीज यासारख्या समस्या असल्यास तुम्ही डीपी मागा, आम्ही आवश्यक तेवढे डीपी उपलब्ध करून देऊ. तसेच, सोलरसाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढील पंधरा दिवसांत कनेक्शन मिळेल, याची मी खात्री देतो. आमच्याकडे कनेक्शन कमी नाहीत. शेतकऱ्यांना 365 दिवस 12 तास वीज देण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांकडून आम्ही विजेचे पैसे घेत नाही. पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देत राहणार आहोत. शेतकऱ्यांचे कल्याण हाच आमच्या सरकारचा हेतू आहे.”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हणाले, “महाजन यांच्या कुस्तीच्या कार्यक्रमाला जर मी उशिरा गेलो, तर ते मला इथेच चित करतील!” त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी उडाली. या शानदार सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणांमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.