मुंबई : देशभरात विकी कौशल यांच्या मुख्य भूमिकेतील ‘छावा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, तो बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याची मागणी होत असून, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, विद्वत्ता आणि पराक्रम अद्वितीय होते. मात्र, इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. आता त्यांच्यावर एक अतिशय दर्जेदार चित्रपट बनवला गेला आहे, त्यामुळे हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, अशी आपलीही इच्छा आहे.”
हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा
मात्र, ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त (टॅक्स फ्री) करता येणार नाही, याचे कारण सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, “इतर राज्यांमध्ये एखादा चित्रपट करमुक्त केला जातो, तेव्हा त्या राज्याचा करमणूक कर (Entertainment Tax) माफ केला जातो. परंतु महाराष्ट्रात २०१७ सालीच हा कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात करमणूक कर नाही, त्यामुळे ‘छावा’ चित्रपट करमुक्त करण्याचा प्रश्नच येत नाही.”
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “संभाजी महाराज यांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न करू. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सरकार काही मदत करू शकते का, यावरही आम्ही विचार करत आहोत.”
चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद
‘छावा’ चित्रपटाने अल्पावधीतच देशभरात विक्रमी कमाई केली आहे. प्रेक्षकांनी चित्रपटातील ऐतिहासिक मांडणीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन, त्यांचे बलिदान आणि पराक्रम यांचा चित्रपटात विस्तृत आढावा घेतला गेला आहे.
महाराष्ट्रात करमुक्तीचा प्रश्नच नाही
महाराष्ट्रात २०१७ पासून करमणूक कर नाही, हे लक्षात घेता, चित्रपट करमुक्त करण्याचा कोणताही निर्णय शक्य नाही. मात्र, सरकार इतर स्वरूपात मदत करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
‘छावा’ चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्याची आणि पराक्रमाची माहिती नव्या पिढीला मिळत आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने पाहावा, यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.