जळगाव : राज्य शासनाने संपूर्ण राज्यभर लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जळगाव जिल्हाभरात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यासोबतच विविध उपाययोजना करण्या सोबतच ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजनेचे अर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
संपूर्ण राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 28 जून 2024 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत शासनामार्फत केली जाणार आहे. या योजनेची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच लाभार्थी महिला यांची फरपट होऊ नये यासाठी सर्व गट विकास अधिकारी यांनी दक्षता घेण्यासोबतच विविध उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत पातळीवर अर्ज होणार उपलब्ध मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्याचा दृष्टीने व महिलांना अर्ज भरतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत पातळीवर या योजनेचे अर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.लाभार्थी महिला,अंगणवाडी सेविका,बचत गटाचे अध्यक्ष ,सचिव, ग्रामसेवक हे या योजनेचे अर्ज भरुन देऊ शकतात.
फॉर्म निशुल्क आहे, शुल्क देऊ नये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज दाखल करणे किवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क शासनातर्फे आकारले जात नाही. त्यामुळे लाभार्थी महिला किंवा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नये असे आवाहन देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.