जळगाव : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांची सेतू केंद्रांवर मोठी गर्दी होऊन गैरसोय होत आहे. त्यामुळे महिलांची सोय व्हावी म्हणून जळगावात भाजप कार्यालयाने मोठा पुढाकार घेतला आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव शहरातील संपर्क कार्यालयात लाडकी बहिण योजनेकरिता महिलांसाठी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. तेथे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून दिला जात आहे, तसेच वेगवेगळे दाखले देण्याची सुविधाही दिली जात आहे.
तसेच यासाठी शासकीय शुल्क व्यतिरिक्त इतर कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसून सुविधा दिल्या जात आहेत. या वेगवेगळ्या सुविधांमुळे मंत्री गिरीश महाजन यांचे संपर्क कार्यालय आता मिनी तहसील कार्यालय बनलं आहे.
या कार्यालयात लाडकी बहिण योजनेची संपूर्ण माहिती देणे, अर्ज भरून देण्यासह वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा महिलांना दिल्या जात आहे. त्यामुळे महिलांची गैरसोय टळली असून भाजप कार्यालयात या योजनेची माहिती घेण्यासह सुविधा घेण्यासाठी महिलांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
इतरत्र होणारी गैसोय टाळण्यासाठी महिलांसह विद्यार्थ्यांनी वेगवेगळे दाखले अथवा कागदपत्र काढून घेण्यासाठी भाजप कार्यालयातील सुविधा केंद्राचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.