लक्ष्मण हाकेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया,पहा काय म्हणाले…

नाशिक : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शनिवारी आपले उपोषण मागे घेतले. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “कालच्या बैठकीत चांगली चर्चा झाली. कुठल्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि कुणावरही अन्याय होऊ नये याबाबत बैठकीत बरीच चर्चा झाली. अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यात काही मुद्दांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचं ठरलं आहे. शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन उपोषण मागे घेतल्याबद्दल मी लक्ष्मण हाकेंचे आभार मानतो,” असे ते म्हणाले.

नाशिक शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “जवळपास ५०० संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि ५० संघटनांनी किशोर दराडे यांना पाठिंबा दिला आहे. किशोर दराडे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांच्यासाठी सातत्याने विधानपरिषदेत आवाज उठवत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक लोकांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे ते लोकप्रिय असून एक हक्काचा आमदार म्हणून त्यांना नावलौकिक मिळाला आहे. किशोर दराडे १०० टक्के आपल्या कामाच्या जोरावर निवडून येतील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.