जळगाव : कायद्यानुसार मुला-मुलींच्या लग्नाचे वय निश्चित करण्यात आले आहे. असे असले तरी ग्रामीण भागात अद्यापही बालविवाह होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे बालविवाह रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रशासनाकडून वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील जनता मात्र प्रशासनाच्या जनजागृतीला केराची टोपली दाखवत असल्याचे प्रकार घडत आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात वर्षभरात जवळपास ५१ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
लहान वयात लग्न केल्याने संपूर्ण समाजात मागासलेपणा येऊन समाजाच्या प्रगतीत अडथळा येतो. यात लहान मुलांच्या आरोग्य तसेच मानसिक विकासासह आनंदी जीवनावर परिणाम होतो. शहर तसेच ग्रामीण भागात बहुतांश पालक वर्ग सुशिक्षित आहे. बालविवाहासारख्या वाईट प्रथेला गरिबी हेदेखील कारण आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी भागातदेखील असे बालविवाह होत असल्याचे चित्र वारंवार अधोरेखित होत आहे. असे बालविवाह होऊ नये, यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या. जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण विभाग. जिल्हा महिला बालकल्याण विभागासह स्थानिक केशवस्मृती प्रतिष्ठानअंतर्गत बालविवाह प्रतिबंधात्मक धडक मोहीम २०२४ दरम्यान राबविण्यात येत होती.
हेही वाचा : १ एप्रिलपासून देशात लागू होणार नवे नियम, घरातील प्रत्येकाच्या खिशावर होणार परिणाम!
पाचोरा तालुक्यात सर्वात जास्त बालविवाहांची नोंद
जळगाव जिल्ह्यात पाचोरा १०, जळगाव ६, अमळनेर ५, जामनेर ५, यावल- ४, मुक्ताईनगर- ३ चाळीसगाव ३, भुसावळ ३, पारोळा- ३, रावेर- ३, धरणगाव २, भडगाव २, बोदवड- १ आणि एरंडोल – १ तर चोपड्यासारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल तालुक्यात मात्र बालविवाह प्रतिबंधकचे प्रबोधन उत्तम प्रकारे केले जात असल्याने एकही बालविवाहाचा प्रकार झाल्याचे दिसून आले नाही.
केंद्र शासनाची ‘मिशन वात्सल्य’ योजना
महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जळगाव आणि संबंधित विभागाच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधात्मक धडक मोहीम २०२४ दरम्यान राबविण्यात येत होती. तत्पूर्वी स्थानिक केशवस्मृती प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून चाइल्ड हेल्पलाइन १०९८ यंत्रणा कार्यान्वित होती. सप्टेंबर २०२३ पासून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘मिशन वात्सल्य’ योजनेंतर्गत चाईल्ड हेल्पलाइन विभागाच्या माध्यमातून २०२४ या वर्षभरात जिल्ह्यातील अनेक तालुका स्तरावर जाऊन तब्बल ५१ बालविवाह प्रतिबंधित करून बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
गेल्या वर्षभरात जिल्हा महिला बाल कल्याण प्रशासनाला ५१ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. यात बाल संरक्षण कक्ष, स्थानिक पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी यांनी संयुक्तरीत्या काम केले आहे. बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यामुळे बालकांच्या हक्कांचे संरक्षण होत आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर जागृत नागरिक माहिती देऊ शकतात.
- आर. आर. तडवी, जिल्हा महिला, बाल कल्याण अधिकारी, जळगाव