मुलांच्या हाती फोन कितपत योग्य?

-विजय कुळकर्णी 

सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. बहुतांश लोक भ्रमणध्वनीवर बोलताना, व्हॉटस् अ‍ॅप, इंटरनेट, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांवरून इतरांशी बोलताना दिसतात. विशेषत: कोरोनामुळे भ्रमणध्वनीचा वापर वाढला. कोरोना काळात टाळेबंदी करण्यात आली होती. kids on smartphone त्यानंतर आभासी पटलावर शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालय, कंपन्या बंद होत्या. काही काळाने कार्यालयीन कामकाज आभासी पटलावर सुरू झाले. तेव्हापासून भ्रमणध्वनी व विशेषत: स्मार्टफोनचा वापर वाढला. अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल प्रत्येकाची गरज झाली. तेव्हापासून लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन दिले गेले. केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालावरून आज ग्रामीण भागातील ४९ टक्क्यांच्या वर मुलांच्या हातात स्मार्टफोन दिसतात. कोरोना काळानंतर शाळा नियमित सुरू झाल्या. सर्व वर्ग नियमित होतात.

हे सर्व आता ऑफलाईन आहे. पण, आपण मुलांच्या हातातील मोबाईल काढून घेण्यास विसरलो. या मोबाईलचा आपली मुलं-मुली कसा, कशासाठी व किती वेळ वापर करतात, याकडे पालकांचे लक्ष नाही. आभासी पटलावरूनच भ्रमणध्वनी पुनर्वर्धित (रिचार्ज) होत असल्याने पालकांच्या मोबाईलवरून ते केले जाते.  मात्र, पालक मुलांना शाळा-महाविद्यालय आता नियमित सुरू असताना मोबाईलवर काय बघतो, न विचारताच मोबाईल रिचार्ज करून देतात. मग मुलं त्यावर सिनेमा डाऊनलोड कर, गाणे डाऊनलोड कर, गेम डाऊनलोड कर असे उद्योग करीत असल्याचे या अहवालात नमूद आहे.

सध्या मोबाईल किंवा स्मार्टफोन हाती असलेल्या मुला-मुलींपैकी ३४ टक्केच मुलं अभ्यासासाठी त्याचा वापर करीत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.  ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाबाबत यात म्हटले आहे की, ४० टक्के पालक आपल्या पाल्यांशी त्यांच्या अभ्यासाबाबत चर्चा करतात. ७६ टक्के मुलं गेम खेळणे, ४७ टक्के गाणे ऐकणे, ५६ टक्के व्हिडीओ पाहणे तर चॅटिंग करणा-यांचे प्रमाण १० टक्के आणि केवळ ३४ टक्के मुलं अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करीत आहेत. त्यामुळे आपली मुलं-मुली निदान पदवीधर व्हावी. त्यांना नोकरी मिळावी, अशी अपेक्षा असलेल्या पालकांचा अपेक्षाभंग होतो. कारण, त्यांचे पाल्य अभ्यासापेक्षा मनोरंजनासाठीच मोबाईलचा वापर अधिक करीत आहेत. केवळ अभ्यासावरच याचा परिणाम होत आहे, असे नाही तर आरोग्यावरदेखील त्याचा विपरीत परिणाम होत आहे.  १६ टक्के मुलं दिवसातील ३ ते ४ तास सरासरी मोबाईलवरच असतात. त्यामुळे त्यांची बैठक वाढली आहे. मैदानी खेळ किंवा खुल्या जागेत जात नसल्याने त्यांच्यातील स्थूलपणा वाढत आहे.

भूक न लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहार कमी झाला. आहार कमी झाल्याने त्यांच्यातील रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे. शिवाय पाठ, मणके, मान व डोळ्यांचे आजार मुलांमध्ये वाढले आहेत. लहान वयातच मधुमेह झाल्याचे प्रकार घडत आहेत. अगदी लहान वयात चष्मा लागण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर चॅटिंग करीत असल्याने उशिरा झोपणे व उशिरा उठणे यात वाढ झाली आहे. हे सर्व मोबाईलवरील उपलब्ध मनोरंजनामुळे घडत आहे.
पालकांनी याकडे वेळीच जागरूक होऊन लक्ष देणे गरजेचे आहे.

आपला मुलगा किंवा मुलगी मोबाईलवर तासन्तास काय करते? अभ्यास करीत आहेत की इतर काही वेगळे पाहण्यासाठी मोबाईलचा वापर करीत आहेत याकडे लक्ष दिले पाहिजे. खरोखर अभ्यासासाठीच मोबाईल आवश्यक असेल तर त्यांना तो देण्यात काहीच गैर नाही. पण, अभ्यास न करता त्यावर केवळ आणि केवळ मनोरंजनच करण्यासाठी मोबाईल वापरला जात असेल तर तो त्यांच्याकडून काढून घेणेच योग्य ठरेल. तेव्हा, पालकांनी याबाबत आपल्या पाल्यांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मुलांनीदेखील आपले वय सध्या शिकण्याचे आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. तेव्हा मोबाईलवर अभ्यासाचे असेल तेवढेच पाहावे. इतर गेम, सिनेमा बघणे, डाऊनलोड करण्यात वेळ व पैसा व्यर्थ घालवू नये. थोडावेळ मैदानावर जाऊन एखादा खेळ खेळावा, असे या निमित्ताने सांगावेसे वाटते.