जळगाव : कानळदा येथील गिरणा नदीत बुडणाऱ्या मुलाचा नवनियुक्त महिला पोलीस कर्मचारी पौर्णिमा कैलास चौधरी यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता नदी पात्रात उडी मारून 10 वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवले. ही घटना रविवारी सकाळी ऋषिपंचमीच्या प्रसंगी घडली. या धाडसाबद्दल या महिला पोलिसाचा सन्मान करण्यात आला.
तालुक्यातील कानळदा येथील गिरणा नदीच्या तीरावर असलेल्या महर्षी कण्वाश्रमात ऋषिपंचमीच्या व्रतानिमित्त दरवर्षी जिल्हाभरातून व जिल्ह्याबाहेरून महिला भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी असते. महिला भाविक नदीमध्ये आंघोळ करून महर्षी कण्वऋषींच्या गुफेमध्ये पूजा करतात.
दरवर्षाप्रमाणे यावर्षीही हजारोंच्या संख्येने महर्षी कण्वाश्रमात व नदी काठावर महिलांची वर्दळ होईल, अशी कल्पना कानळदा गावाचे सरपंच तथा सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक पुंडलिक तुळशीराम सपकाळे यांना होती. त्यामुळे त्यांनी ऋषिपंचमीच्या एक दिवस आधीच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन पूर्वकल्पना देत विशेष बंदोबस्ताची विनंती केली होती. त्यासाठी तालुका पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष करून महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा बंदोबस्त पुरविण्यात आला होता.
हजारो महिला कण्वाश्रमाला लागून असलेल्या गिरणा नदीच्या घाटावर आंघोळ करून महिला वर्गाची नदी तिरावर पूजा सुरू होती. तेव्हा नदी काठावर नैतिक तुषार गायकवाड हा 10 वर्षांचा मुलगा त्याच्या आईसोबत आलेला होता. तेव्हा अचानक पाय घसरून गिरणा नदी पात्रात तो पडला. तो नदीमध्ये बुडत असताना नदी काठावरच आपले कर्तव्य बजावत असलेल्या नवनियुक्त महिला कॉन्स्टेबल पौर्णिमा कैलास चौधरी या महिला पोलीस कर्मचाऱ्याने पाहिले. तो मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसताच क्षणाचाही विलंब न करता; स्वतःच्या प्राणाची कोणतीही पर्वा न करता पौर्णिमा चौधरी यांनी लागलीच पाण्यात उडी मारली. त्यांच्या पाठोपाठ आश्रमाचे सेवेकरी व नदी काठावर पाण्यात एखादा बुडत असल्यास त्याला मदत करण्यासाठी उपस्थित असलेले जितेंद्र दिलीप सपकाळे या दोघांनी मिळून त्याला बाहेर काढले व त्याचे प्राण वाचविले. या महिला कर्मचाऱ्याने दाखवलेली तत्परता व केलेल्या धाडसाचे उपस्थित महिला भाविक, महर्षी कण्वाश्रमाचे विश्वस्त तसेच सरपंच व सदस्यांमार्फत परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
नवनियुक्त महिला कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांना महर्षी कण्वाश्रमाकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन केलेल्या धाडसाचे पोलीस अधिकारी कर्मचारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत कौतुक करण्यात आले.
यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय सायकर, ग्रामपंचायत सदस्य भय्यासाहेब चव्हाण, भिकन सपकाळे, किशोर सपकाळे, जितेंद्र सपकाळे, आश्रमाचे विश्वस्त व सेवेकरी रमेश सपकाळे, अनिल सपकाळे, चेतन सोनवणे, तुषार विसपुते, हंसराज चव्हाण, जयप्रकाश कोळी, वीरेंद्र चव्हाण, प्रवीण चव्हाण, हंसराज चव्हाण, सी.के. चव्हाण, गणेश न्हावकर, प्रमोद भंगाळे, यदुनाथ राणे, चेतन सपकाळे, दिनेश सपकाळे, प्रवीण साळुंखे, नितीन कणखरे, संतोष सपकाळे, सुरेश सपकाळे, कांतीलाल सपकाळे, रमेश धर्मा सपकाळे, बाळा सपकाळे, पंडितजी, मनोज सपकाळे, राहुल सोनवणे, प्रमोद सपकाळे आदी उपस्थित होते.