नंदुरबार : कोरोना प्रतिबंधानंतर दोन वर्षांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नंदुरबारकर सज्ज झाले आहेत. नंदुरबातील प्रमुख ठिकाणी आणि रस्त्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात जमतात. सुरक्षेच्या दृष्टीने नंदुरबार पोलीसांकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करण्यासाठी नागरिक दारू पिवून गाडी चालवत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दारु पिऊन गाडी चालवाताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍ़प, ट्विटर व इतर सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारीत करणाऱ्यांविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेलमार्फत सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस दलाकडून 09 पोलीस निरीक्षक, 31 सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उप निरीक्षक, 456 पोलीस अंमलदार असा एकुण 499 पोलीस अधिकारी व अंमलदांराचा बंदोबस्त संपूर्ण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आलेला आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणीही दारु पिऊन वाहन चालवू नये. दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकादायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे. तसेच नवीन वर्षाचे स्वागत शांततेत व उत्साहात साजरे करावे. – पी. आर. पाटील, पोलीस अधीक्षक, नंदुरबार