जळगाव : शहरातील विविध रस्त्यांच्या कामांची शुक्रवारी आमदार एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांसोबत पहाणी करून नाराजी व्यक्त केली. शहरातील विविध भागातील रस्ते खराब झाले असून, याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना बरोबर घेऊन त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या.
यावेळी त्यांच्यासोबत महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, शहर अभियंता एम.जी. गिरगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे, सूर्यवंशी, योगेश अहिरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांसाठी शासनाने 42 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. या कामाचा कार्यादेश देण्यात आलेला आहे. जळगावकर नागरिकांचे खराब रस्ते व खड्ड्यांमुळे प्रचंड हाल होत आहेत. तरीही मक्तेदाराने आडमुठेपणाची भूमिका घेऊन काम सुरू केले नाही. हे काम लवकरात लवकर सुरू व्हावे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवेदन देणे, घोषणाबाजी करत निदर्शने करणे, आयुक्तांच्या गाडीसमोर झोपणे आदी विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सूचना देऊन मक्तेदाराने कामाला सुरूवात केली. पण सुरू असलेली कामे दर्जेदार नसल्याच्या तक्रारी आल्याने आमदार खडसे यांनी विविध भागात भेटी दिल्या.
अॅड. प्रदीप कुलकर्णीची माध्यमांवर पोस्ट ठरली चर्चेचा विषय
शहरातील अत्यंत दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या प्रतियोगितेबाबत जळगावातील अभियोक्ता अॅड. प्रदीप कुलकर्णी यांनी माध्यमांवर एक पोस्ट व्हायरल केली होती. त्यावरून आज शहरात दिवसभर चर्चा रंगली होती. या पोस्टमध्ये जळगाव शहरात प्रथमच खड्डे चुकवा स्पर्धा असे नाव देत प्रथम बक्षीस 2000 फुली (येत्या निवडणुकीत भेटतील), द्वितीय बक्षीस 1000 फुली (येत्या निवडणुकीत भेटतील), तर ही स्पर्धा सतरा मजलीपासून सुरू होऊन आपल्या घरी शेवट होईल, असे म्हणत याचे आयोजक काम चुकार अधिकारी, भ्रष्ट नगरसेवक व निर्लज्ज भिकारी नागरिक असल्याची पोस्ट सर्वत्र फिरत आहे.
विविध भागात भेटी
नागरिकांच्या तक्रारींची भेट घेऊन शुक्रवारी शहरातील रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी आ. खडसे यांनी केली. सुरवातीलाच जिल्हा न्यायालय ते गणेश कॉलनीपर्यंत सुरू असलेल्या रस्त्यावर जाऊन न्यायालयासमोरचा रस्त्यावर 3 ठिकाणी खोदून पाहणी करण्यात आली. त्यावर कमी थर टाकल्याचे, कामापूर्वी स्क्रॅपिंग न करता त्यावर डांबराचे प्रमाणही अत्यंत कमी प्रमाणात आढळले. तसेच या रस्त्यावर पाणी असूनही काम करण्यात आल्याचे दिसून आले.
शेवटी प्रभाग क्र 1 येथील राधाकृष्ण नगर येथे जाऊन डब्लूएबीएम कामाची पाहणी करत असताना स्थानिक नागरिकांनी समस्या मांडल्या. या कामावर मुरुमाऐवजी माती वापरण्यात येत असल्याचे तसेच खडीकरण करण्यासाठी टाकलेली खडीदेखील परिमाणापेक्षा खूप मोठी असल्याचे दिसून आले व वापरलेले मटेरियल निकृष्ठ असून तरीही त्याचे प्रमाण खूप कमी असल्याचे दिसले. याविषयी आ. खडसे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर संबंधित अधिकार्यांना जाब विचारला. मक्तेदाराकडे इतके मोठे काम वेळेवर करता यावे, अशी यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध नाही. याप्रकरणी पालकमंत्र्यांनी लक्ष घालत मक्तेदारावर उचित कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगर अध्यक्षा मंगला पाटील, रिकू चौधरी, अमोल कोल्हे, डॉ. रिजवान खाटिक, राजू मोरे, इब्राहिम तडवी, भगवान सोनवणे, किरण राजपूत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आयुक्तांकडून प्रतिसाद नाही
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांच्या तक्रारी व आ. खडसे यांनी रस्ते कामांना दिलेली भेट यासंदर्भात मनपाच्या आयुक्त विद्या गायकवाड यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.