जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित येथे आज रविवारी ‘लखपती दीदी’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित महिला वर्गाला संबोधित केले. यावेळी महिला सक्षमीकरण, लाडकी बहिण योजनेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केले. महिला सक्षम करण्याचं केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर हे स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलं, असं ते म्हणाले.
व्यासपीठावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राज्यमंत्री प्रतापराव जाधव, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना, महिलांना प्रोत्साहन दिलं. तुमच्यासाठी हा आनंद सोहळा आहे. जळगाव ही सोन्याची भूमी आहे. इथलं सोनं बावनकशी आहे. इथल्या बहिणीही सोन्यापेक्षा सरस आहे. ११ लाख महिला लखपती होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी योजनेचाही त्यांना लाभ मिळणार आहे.
या योजनेमुळे बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला आहे. तीन मोफत सिलिंडर देण्याची योजना सुरू केली. मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची योजनाही हाती घेतली आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासाला आम्ही प्राधान्य देत आहोत. महिला सक्षम करण्याचं केवळ स्वप्न पाहिलं नाही तर मोदींनी हे स्वप्नपूर्ण केलं आहे. १० कोटी महिलांना त्यांनी आत्मनिर्भर केलं आहे, असं ते म्हणाले.