पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य, तर पीडित कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यासंबंधीची माहिती मंत्रिमंडळ बठकीनंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली. दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले तसेच मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला. हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय कालच मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला होता.
काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश होता. डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी, नवी मुंबईतील दिलीप देसले तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या ६ जणांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. राज्य शासनाने केलेल्या या घोषणेनंतर पीडित कुटुंबीयांनी खरंच आम्हाला मदतीची गरज होती, असे म्हणत शासनाचे आभार मानले.