CNG-PNG Prices Hike : पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर मुंबईकरांना आणखी एक धक्का बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे मुंबईत प्रवास महागण्याची शक्यता आहे. याआधी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली होती. आता मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीही किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएनजीच्या किमतीत १ रुपये आणि सीएनजीच्या किमतीत १.५० रुपये प्रति किलोने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार सीएनजीची नवीन किंमत ७९.५० रुपये प्रति किलो झाली आहे आणि पाईप गॅसची किंमत ४९ रुपये प्रति युनिट झाली आहे. हा निर्णय ९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून मुंबईत लागू होईल.
किंमती का वाढल्या?
घरगुती गॅसच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात वाढ झाल्यामुळे गॅसच्या किमती वाढवाव्या लागल्याचे एमजीएलच्या अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, कंपनीचे म्हणणे आहे की सीएनजी अजूनही पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आहे.
सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम
मुंबईत सुमारे ३ लाखपेक्षा जास्त ऑटो आणि २०,००० हजरापेक्षा अधिक टॅक्सी सीएनजीवर चालतात. फेब्रुवारीमध्येच ऑटो आणि टॅक्सीचे भाडे ३ रुपयांनी वाढवण्यात आले होते. आता पुन्हा किमती वाढल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
६ महिन्यांत चौथ्यांदा किमती वाढल्या
गेल्या ६ महिन्यांत चौथ्यांदा सीएनजीच्या किमती वाढल्या आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्येही किमती वाढल्या होत्या आणि आता पुन्हा एप्रिलमध्येही किमती वाढल्या आहेत.