---Advertisement---
जळगाव : ब्रेक घेतलेल्या थंडीने पुन्हा जोर धरला असून, हवामान विभागाने जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. अर्थात ११ ते १२ डिसेंबरनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीची लाट पसरण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. विशेषतः थंडीची लाट, गारठा आणि हवेतील बदल यांचा थेट परिणाम हृदय व रक्ताभिसरणावर होतो. हिवाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, हे जाणून घेऊयात.
तापमानात अचानक घट झाल्यास शरीराला तत्काळ जुळवून घेणे कठीण जाते. थंडीच्या लाटा किंवा पहाटेचे अतिशीत वातावरण रक्तदाबात वाढ घडवते. हवेतील आर्द्रता व थंड वारे हेही रक्ताभिसरणावर परिणाम करतात. त्यामुळे थंड वातावरणात बाहेर पडणे टाळावे.
रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने हृदयापर्यंत रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. यामुळे छातीत वेदना, धडधड, श्वासोच्छवासात त्रास जाणवू शकतो. हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. हातापायाची बोटेही कडक होतात, थंडीत शरीरातील बाहेरील अवयवाच्या नसा मंदावतात.
आधीपासूनच हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांमध्ये रक्तदाब अचानक वाढण्याची शक्यता जास्त. औषधे नियमित घेत असले तरी थंडीच्या दिवसांमध्ये मोजपट्टीवर रक्तदाबाचे रीडिंग वाढलेले दिसते. स्ट्रोक, हार्ट अटॅकचा धोका वाढण्याचे प्रमाण अभ्यासात दिसून आले आहे.
नेमके कशामुळे असे होते ?
थंड हवेत शरीरातील उष्णता राखण्यासाठी नसा आकुंचित करते. कमी तापमानामुळे सहानुभूतीय (सिंपथेटिक) मज्जासंस्था” सक्रिय होते. त्यामुळे रक्तदाब वाढवणारे हार्मोन्स जास्त प्रमाणात निर्माण होतात. तापमान कमी असताना शरीरातील चयापचयाची गरज” वाढते आणि हृदयाला अधिक काम करावे लागते.
काय करावे?
उबदार कपडे, मफलर, मोजे, हातमोजे वापरा. अचानक थंडीत जाणे टाळा; शरीराचे तापमान समतोल ठेवा. मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा आणि पुरेसे पाणी प्या. नियमितपणे रक्तदाब तपासणी करा. चालणे, हलका व्यायाम, योग-प्राणायाम करा. औषधे डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणातच घ्या; डोस स्वतः बदलू नका. धूम्रपान, तंबाखू, अल्कोहोल कायमचे टाळा.









