ऐन थंडीत उकाडा वाढला ! जळगावात किमान तापमान १८ अंशांवर पोहोचले

#image_title

जळगाव । उत्तर भारतातून येणाऱ्या थंडी वाऱ्यामुळे गेल्या आठवड्यात किमान तापमान १० अंशांपर्यंत घसरल्याने जळगावकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता आला. मात्र आता फेंगल चक्रीवादळामुळे थंडी गायब झाली आहे. मागील दोन तीन दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली. यामुळे ऐन थंडीत काहीशी गर्मी जाणवत होती.

गेल्या आठवड्यात जळगाव शहरासह परिसरातील कमाल तापमान २९ अंश, तर किमान तापमान १० अंशांपर्यंत घसरले होते. यामुळे जळगावकरांना गुलाबी थंडीचा अनुभव आला आहोत. मात्र यानंतर रविवार व सोमवारी त्यात किंचित वाढ होऊन किमान तापमान १४ अंशांवर स्थिरावले होते.

मात्र ढगाळ वातावरण तयार होऊन मंगळवारी ३ डिसेंबर रोजी पहाटे किमान तापमान १८.८ अंशांवर पोहोचले. एकाच रात्रीतून तापमानात ४ अंशांनी वाढ झाल्याने थंडी गायब झाली. तर कमाल तापमान ३०.८ एवढे होते. दुपारी उकाडा वाढून अंगातून घामाच्या धारा निघाल्या. वातावरणाची सद्यस्थिती पाहता ८ डिसेंबरनंतर थंडी वाढून या स्थितीतून सुटका होईल.तोपर्यंत जळगावकरांना अधूनमधून ढगाळ वातावरण व त्यामुळे होणाऱ्या उकाड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागेल.