पारोळा : तालुक्यातील बोधर्डे शिवारात काळ्या बाजारात जाणारा रेशनिंगचा माल साठवून ठेवलेला होता. यावेळी जिल्हाधिकार्यांनी शनिवारी धाड टाकली असता लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे
येथील अमळनेर रस्त्यालगत गट नंबर 35/1 ब मधील एका खासगी गोदामात सरकारी रेशनिंगचा अवैध माल असल्याच्या खबरीवरून शासकीय पथकाने 24 रोजी दुपारी दोन वाजता धाड टाकली. जिल्हाधिकारी डॉ. अमीन मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार अनिल गवांदे, पुरवठा अधिकारी व्ही. व्ही. गिरासे, नायब तहसीलदार आर. व्ही. महाडिक यांच्या उपस्थितीत लाखो रुपयाचा रेशनिंग माल जप्त करण्यात आला. त्यात शेकडो पोते जप्त करण्यात आले. बोधर्डे शिवारातील किरण पंजू वाणी यांच्या एका बंद गोदामात 24 रोजी दुपारी दोन वाजता अचानक धाड टाकत रेशनचा अवैध माल मोठ्या प्रमाणात जप्त केला. त्यात ज्वारी, बाजरी, तांदूळ व गहू आदी मालाची मोजणी चालू होती. एकूण 10 ते 12 हमाल उशिरापर्यंत ही मोजणी करीत होते.
याबाबत प्रत्यक्ष किती माल जप्त झाला याची माहिती रात्री उशिरा किंवा आज दिली जाईल, असे तहसीलदार अनिल गवांदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे संशयित आरोपी किरण पुंजू वाणी यांच्यावर यापूर्वीदेखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. याबाबत स्वतः जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांनी धाड टाकली त्यामुळे खळबळ उडाली आहे.