धुळे जिल्ह्यात कोम्बिंग : १६ तलवारी, सहा पिस्टलसह आठ जिवंत काडतूस जप्त

भुसावळ/धुळे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस दलाने ऑल आऊट व कोम्बिंगदरम्यान विशेष मोहिम राबवत तब्बल १६ तलवारी, सहा पिस्टलसह आठ जिवंत काडतूस जप्त केले तसेच अन्य कारवायांमध्ये १७ पसार आरोपींना बेड्या ठोकल्या या शिवाय कोयता व गुप्तीही जप्त करण्यात आल्याची माहिती धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

१६ तलवारी जप्त
अशोक धोंडू चौधरी (३२, रा. वनश्री कॉलनी, मोहाडी) याच्याकडून दोन तर आझाद नगर पोलिसांनी मोहम्मद हमीद रशीद (३२, रा.माधवपुरा, धुळे) याच्याकडून गुप्ती, धुळे तालुका पोलिसांनी सचिन प्रकाश बागुल (२४, रा. मोराणे) याच्याकडून चार तलवार व महेंद्र देवचंद मोरे (३१, रा.आनंदखेडा, शिरपूर) याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली. शिरपूर शहर पोलिसांनी चरण नारडे (३१), संजय मोतिंगे (३४), रमेश बजरंग गोमलाडू (३३, पिशोर, ता. कन्नड) यांच्याकडून चार तलवारी जप्त करण्यात आल्या. दोंडाईचा पोलिसांनी जट्ट्या उर्फ रोहिदास कोळी (२५, चैनीरोड, दोंडाईचा) याला तलवारीसह पकडले तर पश्चिम देवपूर पोलिसांनी अमर राजू वाघमारे (२७, रा.बाबासाहेब आंबेडकर नगर, नकाणे रोड) आणि पंकज विठ्ठल गवळी (२१, रा. मोगलाई, गवळीवाडा) यांच्याकडून चार तलवार जप्त करण्यात आल्या तर देवपूर पोलिसांनी गौरीशंकर उर्फ गजानन सुरजमल धुर्मेकर (३५, रा. सावरकर पुतळ्याजवळ, धुळे) याच्याकडून कोयता जप्त केला. एकूण ११ आरोपींकडून १६ तलवार, कोयता व गुप्ती जप्त करण्यात आली.

१७ आरोपी जाळ्यात, गावठीवरही कारवाई
यंत्रणेने पोलिसांना हव्या असलेल्या १७ आरोपींना अटक केली. या शिवाय शहर वाहतूक शाखेने १२९ केसेसच्या माध्यमातून ८० हजार शंभर रुपयांचा दंड वसूल केला. चार गावठी हातभट्टीवर कारवाई करीत सात हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. पिंपळनेर हद्दीत गुन्हे शाखेने चोरट्या विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई करीत सात लाखांच्या दारूसह ११ लाखांची क्रेटा वाहन मिळून सुमारे १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

सहा पिस्टलसह ८ जिवंत काडतूस जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी नगरातून अशोक धोंडू चौधरी (३२) याच्याकडून तीन पिस्टल, तीन जिवंत काडतूस जप्त केले तर शहर पोलिसांनी शेख नसीर शेख सद्दाम शेख (२६, रा. शंभरफुटी रोड, धुळे) याच्याकडून एका पिस्टलसह दोन काडतूस जप्त केले. चाळीसगाव रोड पोलिसांनी विश्वजीत ज्ञानेश्वर चौगुले (२४, रा. पवननगर, चाळीसगाव रोड, धुळे) याच्याकडून पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. शिरपूर तालुका पोलिसांनी तिघांना पकडले. शिरपूर तालुाक पोलिसांनी अब्दुला खान कादर खान पठाण (२५, रा.दांडेली, कर्नाटक), संजय केसराम पावरा (२२, रा.भोईटी, पो. रोहिणी, ता.शिरपूर), ईराम डोंगरीया सेनानी (मोहल्ल्या, ता. नेवाली, जि.बडवाणी, रा.मध्य प्रदेश) यांच्याकडून एका पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. एकूण चार गुन्हे नोंदविण्यात आले.