---Advertisement---
मुंबई : राज्यातील वाहन मालकांना सरकारकडून पुन्हा एखादा दिलासा मिळाला आहे. यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांमध्ये उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसविणे बांधकारक करण्यात आले होते. यासाठी नवीन अंतिम मुदतीत जाहीर करण्यात आली आहे. ही मुदत आता नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. जुन्या वाहनांमध्ये HSRP बसवण्याची मर्यादा सरकारने चौथ्यांदा वाढवली आहे.
HSRP बसवण्याची मर्यादा ही मर्यादा मार्च २०२५पर्यंत निश्चित करण्यात आली होती. यानंतर एप्रिल अखेरपर्यंत, नंतर जून अखेरपर्यंत आणि नंतर १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली. आता ही अंतिम मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने १५ ऑगस्ट ही अंतिम मुदत जाहीर केली होती, ज्यामुळे HSRP बसवण्याबाबत वाहनचालकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी गुरुवारी (१४ ऑगस्ट) रोजी संध्याकाळी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात त्यांनी असे म्हटले आहे की, सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (RTO) वाहन मालकी हस्तांतरण, पत्ता बदलणे तसेच वाहनांमध्ये HSRP नसल्यास गहाणखत जोडणे किंवा काढून टाकणे यासारख्या कृतींवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
RTO कार्यालयांना त्यांच्या फ्लाइंग स्क्वॉडने जप्त केलेली वाहने HSRP बसवल्याशिवाय सोडू नयेत असे सांगण्यात आले आहे. या परिपत्रकात असेही म्हटले आहे की, वाहनांवर HSRP बसवले जात नाही तोपर्यंत, पुन्हा नोंदणी करू नका, वाहने बदलू नका किंवा परवाने नूतनीकरण करू नका. याशिवाय, असा इशारा देण्यात आला आहे की, निर्धारित तारखेनंतर, नंबर प्लेट नसलेल्या किंवा अपॉइंटमेंट नसलेल्या वाहनांवर फ्लाइंग स्क्वॉडद्वारे कारवाई केली जाईल.
वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की HSRP बसवण्यासाठी सुमारे ६८ लाख अपॉइंटमेंट बुक करण्यात आल्या आहेत, त्यापैकी ४७ लाख वाहनांवर नंबर प्लेट आहेत. वाहतूक विभागाच्या निविदेनुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी महाराष्ट्रात नोंदणीकृत २.१० कोटींहून अधिक वाहनांमध्ये HSRP बसवणे अनिवार्य आहे, ज्यासाठी तीन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर २०२४ पासून, या कंपन्यांनी HSRP बसवण्यास प्रारंभ केला आहे.