जळगाव महापालिका आयुक्तांची प्रशासकपदी नियुक्ती

जळगाव : शहर महानगरपालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत रविवारी पूर्ण होत आहे. निवडणूक घेणे आता शक्य नसल्याने आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. असे आदेश नगरविकास विभागाचे महापालिकेला प्राप्त झाले आहेत.

नगरविकास विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुळकर्णी छापवाले यांनी याबाबतचे आदेश शुक्रवारी  काढण्याले.  त्यात म्हटले आहे, की राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका विहित वेळेत घेणे शक्य नसल्याने, तसेच संबंधित नागरी संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासक नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे.

त्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदी व विशेष कलम ४५१ ‘अ’ च्या १(अ), १(ब )मधील तरतुदीनुसार रविवारी (ता. १७) मुदत संपत असलेल्या जळगाव महापालिका येथे प्रशासकपदावर आयुक्त जळगाव महापालिका यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपताच प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारावा व अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्‍यक कार्यवाही करावी.महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील शनिवारी  आपला पदभार सोडणार आहेत.त्या आधी ते पत्रकार परिषद घेणार आहेत.