पाणीपुरवठा योजनांची कामे सहामहिन्यात पूर्ण करा : आ. किशोर पाटील यांचे आवाहन

पाचोरा : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे दीडशे गावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांची गती वाढवून आगामी सहा महिन्यात सर्व योजनांची कामे पूर्ण करून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला पिण्याचे मुबलक पाणी देऊन ‘हर घर नल,हर घर जल’ या घोषवाक्याला स्मरून सर्वानीच या योजनेला बळकटी देण्याचे काम सामूहिकपणे करावे, जे अधिकारी, ठेकेदार कामात कुचुराई करतील अशांची आपण गय करणार नाही अशी तंबी आमदार किशोर  पाटील यांनी दिली,  ते पाचोरा येथे झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते .

या बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राठोड यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या विरोधातील तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. आमदार किशोर  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी 11 वाजता पाचोरा शहरातील राजीव गांधी टाऊन हॉल मध्ये ही बैठक झाली.

बैठकीत पाचोरा व भडगाव तालुक्यात सुरू असलेल्या प्रत्येक गावाचा गाव निहाय आढावा घेण्यात आला. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींची जागेवरच सोडवणूक या ठिकाणी करण्यात येऊन योजनेअंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी संबंधित सर्व यंत्रणांना दिले.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोगवटे,प्रांताधिकारी भूषण अहिरे, पाचोरा गटविकास अधिकारी स्नेहल शेलार, भडगाव गटविकास अधिकारी अन्सार शेख, भडगाव तहसीलदार बनसोडे,पाचोरा नायब तहसीलदार कुमावत यांच्यासह सर्व गावांचे सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार, वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंते, नाबार्डचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मंचावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,उपसभापती पी. ए. पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, पाचोरा तालुका प्रमुख सुनील पाटील, भडगाव तालुकाप्रमुख संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह पाटील, मधुकर काटे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

या बैठकीत भूजल सर्वेक्षणातून मिळालेला पाण्याचा स्रोत,पाईपलाईन,गावांतर्गत पाईपलाईन, पाण्याची टाकी बांधकाम आणि विषयात येणाऱ्या तांत्रिक अडचणी जास्त जागी सोडवण्यात आल्या यामुळे आगामी सहा महिन्यात या सर्व योजना पूर्णत्वास जाऊन मतदारसंघातील जनतेला आपण पिण्याचे मुबलक पाणी देण्याचा मानस यावेळी आमदार किशोर पाटील यांनी बोलून दाखवला.