नाशिक : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे उमेदवार आहेत. नाशिक शिक्षक मतदार संघात मुख्यमंत्र्यांनी दराडे यांचा प्रचार केला. या प्रचार दौऱ्यानंतर ते विमानतळाकडे रवाना झाले. त्यांच्या सोबत पालकमंत्री दादा भुसे यांचा ताफा देखील होता. परंतु, दादा भुसे यांची गाडी विमानतळाबाहेरच अडविण्यात आली. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या गोंधळा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं असा घडला प्रकार ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता नाशिक शिक्षक मतदारसंघात आले होते. प्रचार दौरा आटपून ते विमानतळावर जात असतांना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पालकमंत्री दादा भुसे यांची गाडी पोलिसांनी अडवली. विमानतळामध्ये पालकमंत्र्यांच्या गाडीला प्रवेश नाकारण्यात आला. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही गाडी अडवली होती. गाडीला विमानतळाच्या गेटमध्ये प्रवेश नाकारल्याने दादा भुसे यांचे स्वीय सहायक आक्रमक झाले. त्यांनी आम्ही काय आतंकवादी आहे का? असा प्रश्न पोलिसांना केला. पालकमंत्र्यांच्या गाडीत त्यांचे स्वीयसहायक आणि इतर स्टाफ होता. काहीवेळ वाद झाल्यानंतर पोलिसांनी गाडी सोडली.