काँग्रेस व उबाठात अजूनही घमासान! बाहेर सारवासारव करण्याचा राऊतांचा प्रयत्न

मुंबई : राज्यात अखेर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुती व महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भातील चर्चांना उधाण आले होते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी भाजपने पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे मविआ मध्ये संघर्ष सुरु असतानाच दुसरीकडे विदर्भातील काही जागांवरुन काँग्रेस व उबाठा गटामध्ये चांगलीच घमासान सुरु आहे. मविआने जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार विदर्भात उबाठा ला ८ जागा देण्याची तयारी दर्शवली असतानाच उबाठा गट मात्र १२ जागांवर दावा करत असल्याचे बोलले जात आहे. या १२ जागांवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांचा एकही आमदार नाही त्यामुळे या जागा आम्हाला द्याव्या असे ठाकरे गटाचे मत आहे. आणि याच कारणामुळे मविआत नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

विदर्भातील जागावाटपाच्या वादावर काय म्हणाले संजय राऊत ?

विदर्भात १-२ जागा सोडल्या तर काँग्रेससोबत मतभेद नाहीत. महाविकास आघाडी आजही जागावाटपाचा फॉर्म्युला शेअर करु शकते, असे विधान संजय राऊतांनी केले. अमरावती, रामटेक आणि कोल्हापूर लोकसभेची जागा आम्ही लोकसभेला काँग्रेसला दिली. जागावाटपची वेळ येते, तेव्हा त्याग करावा लागतो. जागावाटपात थोडेफार मतभेद होतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करा, असेही ते पुढे म्हणाले.

जागावाटपाची चर्चा संपल्यात जमा आहे. १५ -१६ जागांची चर्चा बाकी आहे. ७ – ८ जागा आमच्यात बदलायच्या ठरवले आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप उद्या संध्याकाळपर्यंत सुटणार आहे. सगळ्या जागांचा तिढा सुटलेला असेल, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.