Congress-BJP-PM Modi तसे तर २०१४ पूर्वीपासूनच काँग्रेसचे तंत्र बिघडले हाेते. पण, नरेंद्र माेदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ते आणखी बिघडले. माेदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर त्यात आणखी वाढ झाली. आता तर माेदींचा तिसरा कार्यकाळ पूर्वीच्या दाेन कार्यकाळाइतकाच दमदारपणे सुरू असल्याने काँग्रेस पुरती बिथरली आहे. मागचा-पुढचा विचार न करता काँग्रेस वाटेल ताे मुद्दा उपस्थित करून वेळाेवेळी ताेंडघशी पडते. याशिवाय त्यांना ६० वर्षांच्या सत्ताकाळात काय झाले, याचेही स्मरण करून दिले जाते. त्यातून काँग्रेसचा कुप्रसिद्ध इतिहास नव्या पिढीसमाेर आपसूकच येत आहे. दिल्ली ते गल्लीपर्यंतचे काँग्रेसचे नेते सैरभैर झाले आहेत. पक्षांतर्गत उणिवा शाेधण्याऐवजी भाजपावर आगपाखड करून स्वत:चे समाधान करण्यात धन्यता मानणाèया काँग्रेसची स्थिती ‘धूळ चेहऱ्यावर आणि स्वच्छता आरशाची’ अशी झाली आहे. या स्थितीची जाणीव करून देणारे काही नेते अजूनही काँग्रेसमध्ये शिल्लक आहेत, पण त्यांचे ऐकण्याची मानसिकता वरिष्ठ नेतृत्वाची नाही.
खाेटे विमर्श तयार करून समाजात पसरवायचे आणि त्यातून भाजपा बदनाम हाेईल व आपल्याला त्याचा फायदा मिळेल, असा अत्यंत हलका फंडा काँग्रेसने हाती घेतला आहे. लाेकसभेत त्याचा थाेडा फायदा झाला, पण त्यानंतरच्या सर्वच विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला सपाटून मार बसला. या फटक्यातूनही काँग्रेस सुधारायला तयार दिसत नाही, याची प्रचीती संसदेत येत आहे. राज्यसभेतले भाजपाचे प्रताेद खा. अनिल बाेंडे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावाच्या बाजूने दमदार भाषण केले. आपल्या १५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी काँग्रेसचा बुरखा टराटरा फाडला. विकसित भारताचा संकल्प असलेल्या राष्ट्रपतींच्या भाषणातल्या काँग्रेसने शाेधलेल्या उणिवादेखील हास्यास्पद असल्याचे खा. बाेंडे यांनी ठासून सांगितले. काँग्रेसने सूचना कराव्या, पण काेणाचा अपमान करण्याचा अधिकार त्यांना नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींनी हिंदू काेड बिलाला विराेध केला, असा चुकीचा विमर्श काँग्रेस पसरविते.
मुखर्जींनी हिंदू काेड बिलाला विराेध केला नाही; उलट त्यांनी साेबतच समान नागरी कायदा पारित करण्याची मागणी करून इतर धर्मातल्या महिलांना न्याय देण्याची भूमिका घेतली हाेती. मुखर्जींचे जम्मू-काश्मीरमधले 370 कलम निष्प्रभ करण्याचे स्वप्न नरेंद्र माेदींच्या नेतृत्वात पूर्ण झाले असून समान नागरी कायदादेखील हाेईल. इतर राज्यांत त्याची सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने कसा त्रास दिला, याची उत्तम मांडणी खा. बाेंडे यांनी संदर्भासह केली. पहिल्या निवडणुकीत डाॅ. आंबेडकर उभे असलेल्या मतदारसंघात 78 हजार मते कशी अवैध ठरविण्यात आली. जयप्रकाश नारायण यांनी त्याला दुजाेरा दिला हाेता, असे सांगून पंडित नेहरूंनी डाॅ. आंबेडकरांविराेधात केलेल्या प्रचाराचा उल्लेख केला. इतकेच नाही तर दुसऱ्या म्हणजे 1954 च्या निवडणुकीत डाॅ. आंबेडकर भंडाऱ्यात उभे असताना त्यांना पराभूत करण्यासाठी पंडित नेहरूंनी सभा घेतल्या.
त्याचवेळी रा. स्व. संघाचे दत्ताेपंत ठेंगडी यांनी मात्र बाबासाहेबांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रचार केला. काँग्रेसने ठरविल्यानुसार डाॅ. आंबेडकरांना पराभूत केले आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती सतत खालावली. त्यांना काँग्रेसने पदाेपदी त्रास दिला, ताे काेणीच विसरणार नाही. ‘लिब्राडू’ असा उल्लेख करत पुरस्कार परत करणाऱ्यांचा खा. बाेंडे यांनी समाचार घेतला. जेव्हा काश्मिरी पंडितांवर अत्याचार हाेत हाेते, तेव्हा काँग्रेसप्रणीत ही टाेळी कुठे गेली हाेती? ‘महाकुंभात डुबकी लावून काेणाचे पाेट भरणार?’ या काँग्रेस नेत्याच्या वाक्याचा उल्लेख करत खा. बाेंडे म्हणाले, पाेट भरणार नाही हे सर्वांनाच माहीत असून आस्था आणि संस्कृतीचा महाकुंभमेळा प्रतीक आहे. अध्यात्मातून आत्मिक समाधान मिळत असल्यानेच काेट्यवधी हिंदू प्रयागराजमध्ये पाेहाेचले. सक्षमपणे उभ्या असलेल्या भारताचे ते बलस्थान आहे.
महाकुंभातल्या दु:खद घटनेचे काँग्रेसने राजकारण केले. असेच हजसंदर्भात बाेलण्याची हिंमत मात्र काँग्रेसवाल्यांची हाेणार का? असा चिमटा घेत त्यांनी काँग्रेसची पाेलखाेल केली. अभिभाषणावर भाजपाच्या ज्या सदस्यांनी आपली मते मांडली, त्या सर्वांनीच काँग्रेसचा बेगडीपणा चव्हाट्यावर आणला. काँग्रेस कशी पदाेपदी भूमिका बदलते आणि देशातल्या नागरिकांना विभाजित करण्याचे षडयंत्र रचते, याची अनेक उदाहरणे सभागृहात देण्यात आली. खा. बाेंडे यांच्या भाषणाची राज्यसभेचे नेते केंद्रीय मंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रशंसा केली. खा. बाेंडे नेहमीच देव-देश-धर्माच्या बाजूने बाेलतात. राष्ट्रहित जाेपासणारी त्यांची अनेक भाषणे काँग्रेसींचा समाचार घेणारी व बुरखा फाडणारी असतात.