जळगाव : आघडी धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नाही,असे प्रतिपादन जळगाव तालुका काँग्रेसचे विधानसभा निरीक्षक विजय महाजन यांनी केले. ते काँग्रेस भवनात आयोजित बैठकीत बोलत होते. याप्रसंगी जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस अध्यक्ष मनोज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका अध्यक्ष मनोज चौधरी व तालुक्याचे विधानसभा निरीक्षक विजय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत जळगाव ग्रामीण मतदार संघ यावेळी काँग्रेसला मिळावा अशी मागणी तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आघाडी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली ती अतिशय चुकीची होती. त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळेच आघाडी पक्षातील उमेदवाराचा पराभव झाला असे स्पष्ट आरोप तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रभारी यांच्यासमोर मांडले.
आजपर्यंत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ जेव्हापासून अस्तित्वात आला तेव्हापासून जळगाव ग्रामीण मतदार संघ हा आघाडी धर्मामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आलेला आहे. यापूर्वी तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इथून उमेदवार दिला व 2009 च्या निवडणूक सोडून दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार इथून पराभूत झालेला आहे. तीन वेळा आघाडीधर्म पाळून काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केलेली आहे. तरी यापुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी एक मुखी मागणी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी प्रभारी यांच्याकडे केली.
अनुषंगाने तालुक्याचे प्रभारी यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या मागील निवडणुकीबाबत व येणाऱ्या निवडणुकी संदर्भात सर्वांच्या व्यथा पक्षश्रेष्ठींकडे मांडून जळगाव ग्रामीण मतदार संघ हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कसा मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
आघडी धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नाही, असे प्रभारी म्हणाले. आघाडीत राहून जर काँग्रेस पक्षाचे नुकसान होत असेल तर एकला चलो चा नारा यावेळी देण्यात आला.
या बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून सुभाष सांडू पाटील जळके व जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यापैकी एका व्यक्तीने जळगाव ग्रामीण विधानसभेची उमेदवारी करावी अशी एकमुखाने मागणी करून ठराव पारित करण्यात आला.
या बैठकीसाठी तालुका प्रभारी विजय महाजन, तालुकाध्यक्ष म्हणून डिगंबर चौधरी, उपाध्यक्ष रवी सोनवणे सुभाष पाटील, संदीप वाघ सुभाष भंगाळे, नरेंद्र सपकाळे, प्रमोद पाटील, विनायक सूर्यवंशी, दिलीप घोलप, नशिराबादचे अध्यक्ष अजित मोमीन, मुश्ताक मोमीन, निशा फेगडे असे तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.