काँग्रेस आजही गांधी कुटुंबाच्याच हातात!

एकेकाळी काँग्रेस कार्यकारिणीमध्ये स्थान मिळणे ही मोठी गोष्ट मानली जायची. आज काय चित्र आहे? ३९ सदस्य, ३२ स्थायी आमंत्रित सदस्य आणि १२ विशेष आमंत्रित सदस्य अशी ही लांबलचक कार्यकारिणी आहे. मात्र, यातले किती जण कामाचे आहेत? उदयपूरला चिंतन शिबिर झाले होते. रायपूरला अधिवेशन झाले होते. या दोन्ही जागी पक्षाच्या कार्यकारिणीत ५० वर्षांखालील ५० टक्के लोकांना स्थान देण्यात येईल, असे ठरले होते. मात्र, या पुनर्रचित कार्यकारिणीत ५० वर्षांखालील फक्त तीन नेते आहेत. म्हातारे-कोतारे घेऊन काँग्रेस लढू पाहते. ३९ सदस्यांपैकी २५ सदस्य जुन्यातले आहेत. शशी थरूर आणि सचिन पायलट ही दोनच ती काय उल्लेखनीय नावं म्हणता येतील. केरळमधून येणारे शशी थरूर यांनी खडगे यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. राजस्थानचे सचिन पायलट यांनी तर आपल्याच सरकारविरोधात बंड पुकारले होते. तरीही एकेकाळच्या या दोघा असंतुष्टांनाच नव्हे, तर आनंद शर्मा, मनीष तिवारी यांनाही घेऊन खडगेंनी समतोल साधण्याची धडपड दाखवली. पण मनमोहन सिंग, ए. के. अ‍ॅण्टोनी, सोनिया गांधी यांना काय विचार करून खडगेंनी घेतले असेल?

मनमोहन सिंग ९० वर्षांचे आहेत. संसदेत जायचे असेल तर त्यांना व्हिलचेअरवर न्यावे लागते. माजी पंतप्रधान, माजी अध्यक्षाला घ्यायचे असा नियम असल्याचे सांगितले गेले.मग १९९९ मध्ये सोनिया गांधी यांच्या कार्यकारिणीत नरसिंह राव यांना का डावलले गेले? ए. के. अ‍ॅण्टोनी ८२ वर्षांचे आहेत. अंबिका सोनी ८० वर्षांच्या आहेत. या दोघांनीही आपण रिटायर झाल्याचे मागेच जाहीर केले होते. तरीही या दोघांना घेतले. त्याचा अर्थ स्पष्ट आहे, पुढारी गांधी घराण्याशी स्वामिनिष्ठ हवा आणि राहुल ब्रिगेडमधला हवा हा निकष लावून भरती झाली. काँग्रेसवाले २४ तास लोकशाहीचा जप करतात. मात्र, पक्ष नियुक्त्यांवर चालवतात. नव्या कार्यकारिणीतही नेमणुकाच आहेत. रायपूरमध्ये काय ठरले होते, याचा सर्वांनाच सोयीस्कर विसर पडला आहे. लोकशाहीचा विषय निघाला म्हणून सांगतो. नव्या कार्यकारिणीत लोकसभेचे फक्त पाच सदस्य आहेत. rahul-priyanka-sonia यातले दोघे गांधी कुटुंबाचे सदस्य म्हणजे सोनिया आणि राहुल आहेत. राज्यसभेच्या १० सदस्यांनाही घेतले आहे. एकेकाळी काँग्रेसच्या तिकिटावर दगडही निवडून यायचा. ते दिवस गेले. तरीही निवडून येऊ न शकणाऱ्या नेत्यांचेच काँग्रेसला आजही आकर्षण वाटते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या कार्यकारिणीत १९ जण असे आहेत की जे कित्येक वर्षांपासून सक्रिय नाहीत, निवडणूक लढले नाहीत. तरीही काँग्रेस त्यांना मिठी मारते; याचा अर्थ काय?

महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना घेतल्याने ते भाजपामध्ये जात असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागेल. पण उपयोग काय? २०१९ ची लोकसभा निवडणूक हरले. ते प्रदेश अध्यक्ष असताना काँग्रेसला राज्यात केवळ चंद्रपूरची एक जागा जिंकता आली. पंजाबचा दलित चेहरा म्हणून चरणजीत चन्नी हेही त्याच माळेतील मणी आहेत. पंतप्रधानपदाचा हायवे उत्तरप्रदेशातून जातो. देश जिंकायचा असेल तर त्या पक्षाला उत्तरप्रदेश आधी जिंकावा लागतो. लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. उत्तरप्रदेशातून किती जणांना या कार्यकारिणीत घेतले आहे? फक्त तिघांना आणि तिघेही परिवारातले म्हणजे सोनिया आणि राहुल-प्रियांका आहेत. एक्सपायरी डेट गेलेल्या औषधासारखे हे तिघे आहेत. महाराष्ट्रात तर फार वाईट परिस्थिती आहे. विलासराव देशमुख यांच्यानंतर पक्षाला नेताच उरला नाही. नाना पटोले, विजय वडेट्टीवार राज्याचे नेते आहेत. पण स्वतःच्या मतदारसंघापलीकडे त्यांचा उपयोग नाही. विदर्भ एकेकाळी काँग्रेसचा गड होता. विदर्भातून मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे, आमदार यशोमती ठाकूर चौघांना घेतले आहे.यांचाही जनाधार शोधावा लागेल अशी स्थिती आहे. गेल्या काही वर्षांपासून फारसे चर्चेत नसलेले माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही लॉटरी लागली आहे. काँग्रेस विरोधकांशी लढण्यापेक्षा आपसात लढते. विदर्भात जेवढी गटबाजी आहे तेवढी कुठेही नसेल. एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते पक्षाला काय ताकद देणार?

२०२४ ची निवडणूक लढायचीच नाही, असे काँग्रेसने मनोमन ठरवले आहे, असे दिसते. इच्छाशक्तीच नाही. देशाला दाखवायला बाहेरचा अध्यक्ष दिला. मात्र, पार्टी आजही कुटुंबाच्याच हातात आहे. अधिकार मिळविण्याकरिता पदाची गरज नाही, हे या निमित्ताने राहुल गांधींनी दाखवून दिले आहे. मी जबाबदारी घेणार नाही. मात्र, हुकूम माझाच चालेल असा राहुलबाबाचा फॉम्र्युला आहे. लोकांच्या कृपेने आजही चार राज्यांत काँग्रेसचे सरकार आहे. पण या चारही राज्यांचे मुख्यमंत्री कार्यकारिणीत नाहीत. रिटायर्ड नेत्यांना तुम्ही घेता, पण मुख्यमंत्र्याला बाहेर ठेवता. काँग्रेसचा हा आजार जुनाट आहे. जिंकायचे तर सोडा, लढण्याचीच इच्छाशक्ती पक्षाने गमावली आहे. लोक भाजपाला कंटाळतील तेव्हा सत्तेचे पाहू, अशा विचित्र मानसिकतेत पक्ष चालू आहे. काँग्रेसची गाठ भाजपाशी आहे. २४ तास इलेक्शन मोडमध्ये राहणाऱ्या भाजपापुढे काँग्रेस कशी टिकणार? गांधी कुटुंबाला त्याची चिंता नाही. भविष्यातली काँग्रेस कुठे असेल? याचा विचार कुठेही नाही. गांधी घराणे काँग्रेसचे भविष्य इतिहासात शोधते आहे. म्हणूनच नेहरू, इंदिरा यांच्या राज्यात कसा सोन्याचा धूर निघत होता, याचे दाखले दिले जातात. पक्ष वर्तमानावर जगतो, हे त्यांना केव्हा कळणार?