काँग्रेसचा फुटका ‘मणी’ !

काँग्रेसमध्ये वाह्यात, वाचाळ, अक्कलशून्य तसेच बेजबाबदार नेत्यांची कमी नाही. अशा नेत्यांचा तो पक्ष महासागर म्हटला तरी हरकत नाही. काँग्रेस पक्षाचा पराभव भाजपा वा अन्य विरोधी पक्षांनी केला नाही, तर काँग्रेस पक्षाला संपवण्यात, नेस्तनाबूत करण्यात अशा नेत्यांचे मोठे योगदान आहे. कु-हाडीचा दांडा गोतास काळ याप्रमाणे या नेत्यांची वागणूक आहे. आपल्या कृतीने आणि उक्तीने या नेत्यांनी काँग्रेस पक्षाचा जनाधार संपवला आहे. तरीदेखील काँग्रेसच्या नेतृत्वाचे डोळे उघडत नाहीत. अशा नेत्यांची नक्षत्रमाळा काँग्रेसमध्ये मोठी असली, तरी त्यात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर आघाडीवर आहेत;

नव्हे ते अशा मूर्ख नेत्यांचे शिरोमणी आहेत. त्यामुळे त्यांना महामूर्खशिरोमणी म्हणायलाही कोणाची हरकत राहण्याचे कारण नाही. मणिशंकर आणि दिग्गीराजा यांनी काँग्रेस पक्षाला अनेक वेळा अडचणीत आणले, त्याचे नुकसान केले. पण काँग्रेस पक्षातील त्यांच्या स्थानाला कोणताच धक्का बसला नाही; उलट ते अबाधित राहिले. नुकत्याच घोषित झालेल्या काँग्रेसच्या कार्यसमितीत या दोघांचा सन्मानपूर्वक समावेश करण्यात आला. वादग्रस्त विधाने करण्याची मणिशंकर अय्यर यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक वेळा त्यांनी अशी विधानं करीत आपली लायकी देशवासीयांना दाखवून दिली आहे.काँग्रेसमधील काही नेते उचलली जीभ लावली टाळूला अशा प्रकारे बोलत असतात. आपले बोलणे किती तर्कसंगत आणि वस्तुस्थितीला धरून आहे, असा विचारही ते करीत नाही. संत तुकाराम महाराज यांनी, तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा’ असे आपल्या एका अभंगात म्हटले आहे.

त्यावेळी असा अभंग रचताना त्यांच्या डोळ्यासमोर मणिशंकर अय्यर असण्याचे कारण नाही. अय्यर यांनी याआधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची नामपट्टिका अंदमानच्या सेल्युलर जेलसमोरून काढून देशवासीयांचा रोष ओढवून घेतला होता. आपल्या ताज्या विधानातून अय्यर यांनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचा अपमान केला नसला, तरी त्यांच्याबद्दलचा आपल्या मनातील राग आणि द्वेष व्यक्त केला हे निश्चित. अय्यर यांचे ताजे विधान ऐकून हसावे की रडावे ते समजत नाही. सामान्यपणे अटलबिहारी वाजपेयी हे भाजपाचे पहिले पंतप्रधान असे आपण समजत होतो. १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. पण पी. व्ही. नरसिंहराव हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, असे धक्कादायक आणि आश्चर्यकारक विधान मणिशंकर अय्यर यांनी केले. आपल्या आत्मचरित्रात अय्यर यांनी अकलेचे असे अनेक तारे तोडले आहेत.

नरसिंहराव यांना काँग्रेस पक्षाने आपले कधीच मानले नाही, जिवंतपणी तसेच मृत्यूनंतरही!काँग्रेस पक्षाने विशेषत: गांधी घराण्याने जिवंतपणी नरसिंहराव यांना छळले तसेच मृत्यूनंतरही त्यांच्या पार्थिवाची विटंबना केली. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नरसिंहराव यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात आणू दिले नाही तसेच त्यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार होऊ दिला नाही.यावरून त्यांच्या मनात नरसिंहराव यांच्याबद्दल किती द्वेष आणि सुडाची भावना भरली होती, याची कल्पना आपण करू शकतो. नरसिंहराव यांनी माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला, पण सोनिया गांधींमुळे मी वाचलो, असे विधान करीत नरसिंहराव यांच्याबद्दल आपल्या मनात चीड का आहे, याचा अप्रत्यक्ष खुलासा अय्यर यांनी केला आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना माणसांची ओळख होती, असे म्हणायला हरकत नाही. कारण राजीव गांधींनी अय्यर यांच्यासारख्या बेअक्कल आणि बेजबाबदार माणसावर कधीच विश्वास ठेवला नाही, त्यांना आपल्यापासून दूर ठेवले, जवळ येऊ दिले नाही. कारण हा माणूस काँग्रेस पक्षासाठी धोकादायक आहे, तो काँग्रेस पक्षाच्या मुळावर उठणार आहे, याचा अंदाज त्यांना तेव्हाच आला होता. त्यामुळे राजीव गांधींना किमान काँग्रेस पक्षाबाबत तरी दूरदृष्टीचे नेते म्हणायला हरकत नाही. मात्र, सोनिया गांधींना राजकारणात माणसांची पारख नव्हती, असे म्हणावे लागते.

अन्यथा त्यांनी अय्यर यांच्यासारख्या नतद्रष्ट माणसाला जवळ केले नसते. राजकारणात त्यांना मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली नसती. स्वत:मध्ये कोणतीही धमक, क्षमता आणि गुणवत्ता नसणारे अय्यर यांच्यासारखे नेते प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अशी विधाने करीत असतात.अय्यर यांचे ताजे तसेच याआधीची सर्व वादग्रस्त विधाने मदिरा प्राशन करून बरळणाऱ्या माणसासारखी आहेत. राजीव गांधींनी अयोध्येत राममंदिराचा शिलान्यास करणे पाप होते. त्यामुळेच नंतरच्या निवडणुकात काँग्रेस पक्षाचा पराभव झाला, अशी मुक्ताफळेही अय्यर यांनी उधळली. यातून अय्यर यांच्या हिंदुद्वेष्ट्या तसेच मुस्लिमधार्जिण्या मानसिकतेचा अंदाज आपल्याला येतो. अय्यर यांनी रामरहिम यात्रा काढली होती. या यात्रेला तेव्हा राव यांनी विरोध केला होता. राव यांचा विरोध हा अय्यर यांच्यासारख्या नेत्यांच्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेला होता.

कारण या लोकांना धर्मनिरपेक्ष या शब्दाचा खरा अर्थच समजला नाही. धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार न करता सर्व धर्मांबद्दल आदराची भावना ठेवणे. पण अय्यर आणि त्यांच्यासारख्या अन्य काँग्रेस नेत्यांची धर्मनिरपेक्षतेची व्याख्या म्हणजे मुस्लिमांचे तुष्टीकरण करणे तसेच हिंदूंचा द्वेष करणे, त्यांच्यावर अन्याय करणे अशी होती. नरसिंहराव यांना हिंदू द्वेषाचे तसेच मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण मान्य नव्हते, या मुद्यावर त्यांनी अय्यरसारखी मानसिकता असलेल्या नेत्यांना विरोध केला म्हणून अय्यर यांचा नरसिंहरावांवर राग होता. याचेच प्रतिबिंब त्यांच्या या तथाकथित आत्मचरित्रात उमटले आहे. खरं म्हणजे अय्यर यांच्यासारख्या दीडदमडीच्या नेत्याला आत्मचरित्र लिहिण्याचीही गरज नव्हती. राजकारण असताना तसेच केंद्रात मंत्रिपद भूषवताना त्यांनी कोणतीही उल्लेखनीय कामगिरी केली नाही, ज्यासाठी त्यांना ओळखले जावे. गांधी घराण्याची विशेषत: सोनिया गांधी यांची चापलुसी करीत अय्यर यांनी केंद्रात मंत्रिपद मिळविले. याच चापलुसीचे दर्शनही त्यांनी आपल्या हाताने आत्मचरित्रातून घडविले आहे. अनेक ठिकाणी सोनिया गांधींचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

अय्यर यांनी आपल्या निष्ठा कोणाच्या चरणी वाहाव्या, हा पूर्णपणे त्यांचा विषय आहे. मात्र, असे करताना कारण नसताना दुसऱ्या नेत्यांवर अन्याय करू नये. नरसिंहराव यांच्या पायातील खेटराचीही बरोबरी अय्यर करू शकत नाही; तेवढी त्यांची लायकी आणि पात्रताही नाही. आधी अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही असाच अपमान केला होता. आता त्यांनी नरसिंहराव यांचा केला आहे. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी दुसरा कुणी असल्याचा अंदाज करता येतो. हिज मास्टर्स व्हॉईसप्रमाणे अय्यर आपल्या धन्याच्या मर्जीने भुंकत असतात, असा कोणाचा समज झाला तर त्याला दोष कसा द्यायचा. आपली राजकीय समज किती, प्रगल्भता किती, अक्कल किती आणि आपण बोलतो किती आणि काय याचा विचार अय्यर यांनी आता तरी केला पाहिजे. अय्यर यांच्यासारखे नेते म्हणजे भारताच्या राजकारणातील तसेच लोकशाहीवरचा कलंक आहे, असे म्हटले तरी ते चूक ठरू नये. विंचवाची नांगी जशी पायाच्या जोड्यानेच ठेचावी लागते, तसेच अय्यर यांच्यासारख्या बिनाशेपटीच्या वळवळणाऱ्या नेत्यांची नांगीही मतदारांनी ठेचून काढली पाहिजे, त्याशिवाय त्यांचे डोके आणि अक्कल ठिकाणावर येणार नाही.